www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या गर्दीवर मात करण्यासाठी मोनोरेलचे स्वप्न दाखविण्यात आले आहे. मात्र, निर्धारीत वेळेत मोनोरेल धावू लागलेली नाही. केवळ चाचपणीच सुरू आहे. आता पुन्हा डिसेंबरचे स्वप्न मोनोचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत वाट पाहण्याशिवाय हाती काही नाही.
मोनोरेलचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल. पहिल्या टप्प्यातील काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर 'कर्मशियल ऑपरेशन' सुरू करण्यात येणार असल्याचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी चाचपणी दरम्यान सांगितले.
'मोअर कार्ड'साठी मोनो-मेट्रो-बेस्ट आणि रेल्वेचा प्राधान्याने विचार करण्यात येत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप याबाबत सकारात्मक उत्तर दिलेले नाही. 'मोअर कार्ड' राबवण्यासाठी एक समितीही नेमण्यात येणार आहे.मोनोरेलच्या मार्गातील वडाळा-चेंबूर या पहिल्या टप्प्यातील बरेच कामकाज पूर्ण झाले असून, डिसेंबरमध्ये मोनो मुंबईकरांच्या सेवेत हजर होईल.
कुठून कोठे धावणार मोनो
■ वडाळा कारशेडमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान भक्ती पार्क स्थानकापर्यंत मोनो धावली
■ मोनोरेलच्या संत गाडगे महाराज चौक-वडाळा-चेंबूर या मार्गावरील वडाळा-चेंबूर या पहिल्या टप्प्यादरम्यान मोनोरेल धावेल.
■ वडाळा आगार, भक्ती पार्क, म्हैसूर वसाहत, भारत पेट्रोलियम, फर्टिलायझर वसाहत, व्ही. एन. पुरव मार्ग, आर. सी. मार्ग जंक्शन, चेंबूर स्थानक यांचा समावेश असून, व्ही. एन. पुरव मार्ग हे सर्वात मोठे स्थानक आहे.