www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलविरोधी विधानानंतर मुंबईतून सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण राज्यभर पसरतंय. बुलढाण्यातही मनसैनिकांनी टोलनाक्यावर तोडफोड केलीय.. दुसरबीड टोलनाक्यावर मनसैनिकांनी हल्लाबोल केलाय. यावेळी 15 ते 20 मनसे कार्यकर्त्यांना अटक केलीय.
मनसेचे टोलविरोधी आंदोलन आजही सुरुच आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई- अहमदाबाद हायवेवरील खानिवडे टोल नाका बंद पाडलाय. शेकडो कार्यकर्ते सकाळच्या सुमारास खानिवडे टोल नाक्यावर दाखल झाले. त्यांनी टोल वसुली बंद केली. विनाटोल वाहनांना त्यांनी सोडलं. यावेळी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वाशी टोलनाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मनसेनं दिलेल्या टोल नाक्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
राज्यात होणा-या अवैध टोलवसुलीविरोधात राज ठाकरे आक्रमक झाले आहेत... प्लास्टिकबंदी करण्यापेक्षा टोल बंद करा, असा टोलाच त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. राज यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनीही दहिसर, ठाण्यात टोलनाके बंद पाडले आहेत.. आता हे आंदोलन राज्यभरात पेट घेण्याची शक्यता आहे..
प्लास्टिकबंदीवरुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना, राज ठाकरेंनी ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात टोलविरोधात मैदानात उतरण्याचा हा असा आदेश दिला.. आणि काही वेळातच त्याचे पडसाद राज्यात उमटण्यास सुरुवात झाली..
दहिसर टोलनाक्याची तोडफोड करत, मनसैनिक रस्त्यावर उतरले.. यावेळी पोलिसांनी लाठीमारही केला.. तर ठाण्याचा घोडबंदर टोलनाकाही मनसैनिकांनी बंद पाडला.. ठाण्याच्या आनंनदनगर टोलनाक्यावरही मनसैनिकांनी मॅनेजरला घेराव घातला.. या पडसादानंतर मंगळवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात राज यांनी टोलबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट केली..
टोलच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाल्यानं, मुंबई, ठाणे परिसरातल्या टोलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. गेल्या अनेक दोन-तीन वर्षांपासून टोलवर जनतेची लूट करण्यात येत असल्याचा आरोप सातत्यानं होतोय, यासाठी वेळोवेळी आंदोलनही होतायेत..
मात्र त्यावर कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही.. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही नुकतीच टोलविरोधात आंदोलनाची घोषणा केलीय. आता राज ठाकरे या मुद्द्यावर मैदानात उतरवल्यानं, हा मुद्दा रस्त्यावर आणि राजकीय पातळीवरही पेटण्याची शक्यता आहे. मात्र आतातरी या मुद्द्यावर ठोस उत्तर मिळावं हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे..