मुंबई : मुंबईच्या विविध भागात आज धुलिवंदनाची धूम होती पण या धुलिवंदना दरम्यान ६८ जण जखमी झाले आहेत.
यातील ४० जण धुलिवंदनासंदर्भात झालेल्या घटनामध्ये केईएममध्ये दाखल करण्यात आले होते. यातील दोघे धुलिवंदनासाठी जात असताना अपघातात जखमी झाले आहे. त्यांना दाखल करण्यात आले आहे. इतरांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले.
४० पैकी दहा जणांना रंगामुळे डोळ्यांना ईजा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यात कोणालाही गंभीर जखम झालेली नाही, केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
दरम्यान, सायन हॉस्पिटलमध्येही १८ जणांना भरती करण्यात आले होते. किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनाही उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तसेच नायर रुग्णालयातही १० जणांना धुलिवंदनादरम्यान जखमी झाल्याने कॅज्युलिटी विभागात आणण्यात आले होते.
दरम्यान, मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील आकडा अद्याप उपलब्ध झालेला नाही.