कृष्णात पाटील, मुंबई : मुंबई महापालिकेचं इलेक्शन बजेट आज सादर करण्यात आल्यानं. वर्षभरावर येऊन ठेपलेली निवडणूक नजरेसमोर ठेवून, फारशी करवाढ न लादणारं बजेट मुंबई महापालिका प्रशासनानं आज मांडलं...
मुंबई महापालिकेच्या आज सादर झालेल्या बजेटमधील या ठळक तरतुदी... या बजेटमध्ये कच्चा तेलावरील जकात कर 3 टक्क्यांवरून 4.5 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्यामुळं मुंबईत पेट्रोल आणि डिझलचे दर वाढणार आहेत. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्याकडे बुधवारी अर्थसंकल्प सादर केला.
मुंबईकरांना आता अवघ्या 15 दिवसांत जलजोडणी मिळेल, अशी आनंदवार्ता देखील या बजेटनं दिलीय. तर मुंबई बाहेरून महापालिका रूग्णालयांमध्ये येणा-या रूग्णांसाठी स्वतंत्र शुल्क आकारणीचा प्रस्तावही प्रशासनानं मांडलाय. सध्या बीएमसी रूग्णालयात 45 टक्के रूग्ण हे बाहेरचे आहेत. त्यांच्यासाठी आरोग्यसेवा महागण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईकरांवर कोणतीही नवी थेट करवाढ नसल्यानं यंदाचं हे बजेट इलेक्शन बजेट ठरलंय.
मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत १०७ कोटींची कपात करण्यात आलीयं. एकूण २३९४ कोटींचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला... या बजेटमध्ये मुंबई महापालिका भगिनी शाळा ही नवी संकल्पना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलीये. त्याअंतर्गत नामांकित खाजगी शाळांमधले शिक्षक आठवड्यातून दोन तास महापालिका शाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. मात्र या योजनेला विरोध होण्याची शक्यता आहे.