शिवसेना-भाजपातील आरोग्य बिघडलं?

सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील संघर्ष दिवसागणिक वाढतच चाललाय... आधी एकमेकांवर तोंडसुख घेणारे युतीचे मंत्री आणि नेते आता वेगवेगळ्या योजनांवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. शिव आरोग्य योजनेवरून आता वादाची नवी ठिणगी पेटलीय...

Updated: Feb 2, 2015, 07:32 PM IST
शिवसेना-भाजपातील आरोग्य बिघडलं? title=

मुंबई : सत्ताधारी शिवसेना-भाजपमधील संघर्ष दिवसागणिक वाढतच चाललाय... आधी एकमेकांवर तोंडसुख घेणारे युतीचे मंत्री आणि नेते आता वेगवेगळ्या योजनांवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. शिव आरोग्य योजनेवरून आता वादाची नवी ठिणगी पेटलीय...

केवळ राजकीय मजबुरी म्हणून एकत्र आलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांत गेले काही दिवस 'तूतू- मैंमैं' सुरु आहे. मुंबईच्या मरिन लाइन्सवर एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेऊन भाजपनं शिवसेनेला डिवचलं. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये उघड संघर्ष झाला. भाजपनं त्याला दाद दिली नाही. त्यामुळे शिवसेनेनं दुष्काळग्रस्तांच्या मदतीवरून भाजपला फटकारण्याची संधी सोडली नाही. त्यावरूनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना सुनावलं. 

शिवसेनेच्या मंत्र्यांना सगळी दुय्यम खाती मिळाल्यानं लाल दिव्याची गाडी असली तरी सत्तेचं समाधान मिळेनासं झालंय. मुख्यमंत्री आणि भाजपचे मंत्री वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांची छाप कुठेच दिसेनाशी झालीय. 

त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतील टेलिमेडिसीनची योजना राबवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला... शिव आरोग्य सेवा या नावानं ही योजना लाँच केली. मात्र या योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपला डावलण्यात आलं.

या योजनेला खासगी उद्योगांचंही पाठबळ हवं असं सांगत, उद्धव ठाकरेंनी या योजनेसाठी केवळ सरकारी मदतीवर अवलंबून नसल्याचं सूचित केलं.

शिवसेनेनं गाजावाजा करून सुरू केलेल्या या योजनेत भाजपला काहीच नाविन्य दिसलं नाही. उलट या कार्यक्रमात सरकारी अधिका-यांच्या उपस्थितीवरच भाजपनं आक्षेप घेतला.

शिवसेनेची पुरती कोंडी करण्याचा भाजपचा स्पष्ट प्रयत्न आहे. सत्तेचं समाधान नसल्यानं संधी मिळेल तेव्हा शिवसेना नेतेही विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन भाजपवर टीका करतात आणि भाजपचे नेते त्यांच्यावर पलटवार करतात. सत्ताधारी पक्षच एकमेकांना असा शह-काटशह देत असतील तर सरकारचा गाडा चालणार कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.