मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत चार सेक्टरमध्ये विकसित केल्या जाणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. यासाठी जागतीक पातळीवर निविदा मागवल्या जाणार आहेत. तर धारावीमधील एक सेक्टर याआधीच म्हाडा विकसित करत आहे.
मुंबई शहर आणि उपनगर यांच्यामधोमध सुमारे 500 एकर जागेवर वसलेली धारावी जी आशियातील सर्वात मोठी झोपड़पट्टी म्हणून ओळखली जाते. तसंच या धारावीत साडे तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटिने राहते.
चार सेक्टरचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने आता या भागातील 68 हजार कुटुंबांना प्रत्येकी 400 चौरस फूटाची घरे देण्याच्या निर्णयावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. यापैकी 50 चौरस फूट फंजिबल एरिया तर 350 चौरस फुटचे घर अशी व्यवस्था असेल. या प्रकल्पासाठी 4 FSI दिला जाणार असल्याने या प्रकल्पात सुमारे 40 हजार अधिक घरे उपलब्ध होणार आहेत.
दोन आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरु करणार असून ही निविदा प्रक्रिया 90 दिवसांत पूर्णही केली जाणार आहे. त्यामुळे या वर्षातच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरु झाले तर आश्चर्य वाटायला नको. तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा हा अवाढव्य प्रकल्प 7 वर्षात पूर्ण केला जाणार आहे.
किमान तसा दावा सरकार करत आहे. याआधी विविध कारणांमुळे या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या होत्या. तेव्हा किमान आता हा प्रकल्प मार्गी लागेल अशी आशा आहे.