मुंबई : तरूणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी ड्रग माफिया नवनव्या शक्कल लढवत आहेत. यावेळी ड्रग्ज स्मगलिंगसाठी माफियांनी जे नवं तंत्र वापरलं, ते एकल्यानंतर धक्का बसेल. काय आहे हा नवा प्रकार?
ड्रग्ज सौदागरांचा धक्कादायक 'प्लान' आखला गेलाय. नशेच्या दुनियेत 'कंडोम ड्रग्ज'ची एन्ट्री झालेय. कंडोमच्या पॅकेटमधून ड्रग्जची तस्करी, होत अल्याचे पुढे आलेय.
होय.. हे खरंय... पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी ड्रग्ज माफियांनी नवी आयडिया शोधून काढलीय. कंडोमच्या पाकिटांमधून ड्रग्जची तस्करी करण्याची. गोवा पोलिसांनी अलिकडंच अंजुना बीचवर डेव्हिड जॉन्सन नावाच्या ब्रिटिश नागरिकाला अटक केली, तेव्हा या नव्या मोडस ऑपरेंडीचा खुलासा झाला. त्याच्याकडून तब्बल 18 लाख रूपये किंमतीचं एक्सटेसी आणि एलएसडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
कंडोममध्ये ड्रग्जची प्लास्टिकची पाकिटे ठेवून तो तस्करी करायचा, अशी धक्कादायक बाब त्यानं पोलिसांना सांगितली. असं करणारा डेव्हिड हा एकटाच नसावा. तर ड्रग्ज माफियांनी ही नवी पद्धती अवलंबली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडोममध्ये ड्रग्ज लपवून ते सहजपणे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेता येतात. कंडोम बाळगल्यानं कुणाला संशयही येत नाही. वेगवेगळ्या रंगाच्या कंडोममध्ये वेगवेगळी ड्रग्ज पुरवली जात असल्याचंही सांगितलं जातंय.
गोवा पोलिसांनी ही माहिती देशातल्या तमाम अंमलीपदार्थ विरोधी पथकांना दिलीय. अशाप्रकारच्या स्मगलिंगचा हा पहिलाच प्रकार असल्याचं सांगितलं जातंय. ड्रग्ज तस्करांचा हा नवा डाव लक्षात आल्यानंतर आता मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांतील पोलीस सावध झालेत. ड्रग्ज माफियांचा हा नवा प्लान उद्धवस्त करण्यासाठी आता पोलिसांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.