www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मंगळवारी रात्री भीषण दुर्घटनेमुळं अफरातफर माजली. नौदलाच्या INS सिंधुरक्षक पाणबुडीला आग लागल्याच्यावृत्तानं सुरक्षा यंत्रणांचं धाबं दणाणलं. पाणबुडीमध्ये झालेल्या या भीषण स्फोटानंतर नौदलाचे किमान 18 कर्मचारी बेपत्ता असल्याचं समजतंय. बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये तीन नौदल अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आगीचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहेत.
मुंबईच्या कुलाब्यातल्या नौदल डॉकयार्डात मंगळवारी रात्री १२ वाजता भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की नौदलाचे आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न तोकडे पडू लागले. ही आग भडकताच मुंबई अग्निशमन दलाच्या तसंच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या किमान 16 पथकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं असून या तळावरील इतर नौकांना असलेला आगीचा धोका टळला आहे. नौदलानं घडल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
१५ ऑगस्टच्या १ दिवस आधी लागलेली आग अनेक प्रश्न उपस्थित करतेय. सुरुवातीला या पाणबुड्यांमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर मोठमोठाल्या आगीच्या ज्वाळा आकाशात दिसू लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. स्फोटांचा आवाज इतका भीषण होता की भिंतींनाही तडे गेलेत.
सिंधुरक्षक पाणबुडीला लागलेली आग हळुहळू इतर पाणबुड्यांना आपल्या विळख्यात घेऊ लागली. हे पाहून त्यातल्या खलाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुर्घटनेनंतर मुंबई तटरक्षक दलाला अलर्ट देण्यात आलाय. मात्र इतक्या संवेदनशील परिसरात आग कशी लागली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
दरम्यान, आगीनंतर आता सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी मिळालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.