मुंबई: राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. यामध्ये गुन्हेगाराचा पाठलाग करुन बिमोड करणारी मर्दानी राणी मुखर्जी दाखवण्यात आलीय. मुंबईतल्या गोरेगाव पूर्वमध्ये अशीच एक मर्दानी आहे. पण रिल लाईफमध्ये नाही तर रियल लाईफमध्ये.
गोरेगावच्या माधुरी मस्के या 24 वर्षाच्या तरुणीनं मर्दानी स्टाईलनं सोनसाखळी चोराला पकडून दिलंय. गोरेगावच्या एमएचबी रस्त्यावर चालत असताना समोरून आलेल्या तिघा अल्पवयीन मुलांपैकी एकानं तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. परंतु प्रसंगावधान राखून माधुरीनं सोनसाखळी खेचणाऱ्या मुलाची कॉलर पकडली आणि त्याला आपली मर्दानी स्टाईल दाखवली.
तोपर्यंत त्यानं खेचलेली सोनसाखळी आपल्या साथिदाराकडे सोपविली होती. सुटका करण्यासाठी तो माधुरीशी झटापट करू लागला. परंतु तिनं त्याची पकड सैल होऊ दिली नाही. त्याला रस्त्यावर लोळवलं आणि बचावासाठी आरडाओरडा केला. त्यामुळं जमा झालेल्या नागरिकांनी लगेच संबंधित मुलाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.