मुंबई : गेले कित्येक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. दहा जुलै आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. भाजपचे मित्रपक्ष आणि शिवसेनेचे मंत्रीही या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेण्याची शक्यता आहे.
भाजप 12 पैकी 2 मंत्रिपदं रिकामी ठेऊन इतर सर्व रिक्त मंत्रीपद भरणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला दोन राज्यमंत्री पदं येणार आहेत. मात्र शिवसेने बरोबरच्या अंतर्गत वादामुळे ही पदं भरताना वाद होण्याची शक्यता आहे. भाजप आपल्या वाट्यातल्या 8 जागांची वाटणी मित्रपक्षांसोबत करणार आहे. यामध्ये मित्रपक्षांना 3 मंत्रीपदं तर भाजपच्या वाट्याला 5 मंत्रीपदं येणार आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.
रामदास आठवलेंना केंद्रात मंत्रीपद मिळालं नाही, तर आठवले राज्यात परत येऊन मंत्री होऊ शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रामदास आठवलेंचं नावही चर्चेत आहे.