मुंबई : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावणारा श्वानपथकातील महत्त्वाचा सदस्य असणाऱ्या 'मॅक्स' या श्वानाचं शुक्रवारी निधन झालं. विरारमधील पशूविश्रामगृहात त्याचं निधन झालं. गेले अनेक वर्ष वय झाल्याने तो आजारीच होता.
मॅक्स हा मुंबई पोलीस पथकात ज्वालाग्राही पदार्थ शोधण्याची भूमिका पार पाडत असे. २६/११ हल्ल्याच्या वेळेस त्याने ताज महाल हॉटेलच्या बाहेर तब्बल ८ किलो आरडीएक्सचा शोध लावला होता ज्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली होती.
तसेच ७/११ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या वेळीही त्याने झवेरी बाजार येथे जिवंत बॉम्ब शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २६/११ हल्ल्याच्या वेळी ताज महाल हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरकडेही त्याने २५ ग्रेनेड शोधलो होते. त्याने बजावलेल्या मह्त्त्वाच्या भूमिकेमुळे त्याला अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन त्याचा गौरवही करण्यात आला होता.
२००४ साली जन्मलेला मॅक्स २००५ साली मुंबई पोलीस दलात दाखल झाला होता. तर गेल्या वर्षी म्हणजे २०१५ साली तो पोलीस दलातून निवृत्त झाला. तेव्हापासून तो विरारच्या पशूविश्रामगृहात राहात होता.
पण, दुःखद बाब अशी की इतकी अविरत सेवा करणाऱ्या मॅक्सला शेवटचा निरोप देण्यासाठी मुंबई पोलीस दलातील एकही अधिकारी उपस्थित नव्हता. मुंबई मिरर वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार 'आयपीएलच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याने मॅक्सच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणं शक्य नसल्याचं' कारण मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलं. त्याचे प्रशिक्षक फिझाह शाह आणि माजी प्रशिक्षक सुभाष गावडे हे मात्र त्याच्या अंत्यविधींसाठी उपस्थित होते.