www.24taas.com, मुंबई
मुंबईतील वादग्रस्त बिल्डर निरंजन हिरानंदानी यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज ठाकरे यांनी चक्क हिरानंदांनी यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. आशा भोसले यांच्यावर पैसा देवो भवः अशी टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी गरिबांच्या जागेवर मोठमोठ्या इमारती बांधणाऱ्या हिरानंदानींची स्तुती केल्याने राज ठाकरेंचेही हे पैसा देवो भवः आहे का, अशी टीका केली जात आहे.
मिफ्ताच्या सांगता सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते, त्यावेळी त्यांनी हिरानंदानी यांची स्तुती केली. गिरणी कामगार आणि मराठी विस्थापितांसाठी घरं बांधू असं सांगून हिरानंदानी यांनी सरकारकडून अत्यल्प दरात जमीन लाटल्या आणि त्या जागेवर टोलेजंग इमारती बांधल्याचा हिरानंदांनीवर आरोप आहे. त्याविरोधात पवईच्या हिरानंदानी परिसरात जुलै महिन्यात मोर्चा काढण्यात आला.
मुंबई हायकोर्टानेही याविषयी हिरानंदानी यांच्यावर ताशेरे ओढले होते. कालच्या कार्यक्रमात आयआरबीच्या म्हैसकरावंर राज ठाकरे यांनी ताशेरे ओढले. मात्र, गरिंबाच्या जमिनी लाटण्याचा आरोप असलेल्या हिरानंदानींचा सत्कार त्यांच्या हस्ते झाल्यानं राज ठाकरे पुन्हा एका वादात ओढले गेले आहे.
पाकिस्तानी कलाकरांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्रमध्ये आशाताईंनी सहभाग घेऊ नये. आशाताईंचे हे अतिथी देवो भव आहे की पैसा देवो भवः आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. परंतु, पैसेवाल्या हिरानंदानींची स्तुती केल्यांने राज ठाकरेही पैशासमोर नतमस्तक झाले की काय अशी चर्चा केली जात आहे.