राज ठाकरेंच मराठी नंतर ‘नवं हिंदुत्व कार्ड’

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईत होणा-या मोर्चाचं राजकीय दृष्ट्याही वेगळं महत्व आहे.

Updated: Aug 20, 2012, 08:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईत होणा-या मोर्चाचं राजकीय दृष्ट्याही वेगळं महत्व आहे.... वेगवेगळ्या रंगाचा झेंडा घेऊन विधायक राजकारणाचा इरादा व्यक्त करणा-या राज ठाकरेंनी नंतर मराठीचा मुद्दा खणखणीतपणे वाजवला. आता या मोर्चाद्वारे हिंदुत्वाच्या वाटेवरही त्यांची वाटचाल सुरु होण्याची चिन्हं आहेत.. राज ठाकरे. या नावानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष सर्वात प्रथम वेधून घेतलं ते एका मोर्चाद्वारेच.. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला नागपुरातल्या विधिमंडळावर राज्यातल्या बेरोजगारांचा भव्य मोर्चा काढून राज ठाकरेंनी ख-या अर्थानं आपल्या राजकारणाला सुरुवात केली.
पुढे शिवसेना सोडल्यानंतर मनसे स्थापन करून विधायक राजकारणाचा अजेंडा राज यांनी हाती घेतला. २००७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेविरोधात मुंबईत मोर्चा काढून नागरी प्रश्नांवर आवाज उठवला. तो मोर्चा मनसेसाठी टर्निंग पॉइंट निश्चितच ठरला नाही. पण परप्रांतीयांविरोधातलं आंदोलन राज यांनी हाती घेतलं आणि मराठीचा मुद्दा खणखणीतपणे वाजवून घेतला. पुढच्या निवडणुकांत त्याचे परिणामही दिसले. मधल्या काळात राज यांनी जाहीर सभा जरूर गाजवल्या, पण मोठ्या कालावधीनंतर ते पुन्हा एकदा मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करतायत.
सीएसटी हिंसाचारानंतर दंगलखोरांवरील कारवाईवरून राज यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना टार्गेट केलं. कारवाईत वेगवेगळा न्याय कशासाठी हा त्यांचा प्रश्न आहे. भाजप, शिवसेनेनं हा मुद्दा आपआपल्या पद्धतीनं उचलला असताना राज थेट मोठा मोर्चा काढून सर्वांचं लक्ष वेधून घेतील. या मोर्चामुळे मनसेची वाटचाल कदाचित हिंदुत्वाच्या वाटेवरही होण्याची शक्यता आहे. राज यांचा शिवसेनेतला इतिहास आणि नरेंद्र मोदींबरोबरची जवळीक यामुळे हिंदुत्व त्यांच्यासाठी नवे नाही.
पण या निमित्तानं हिंदुत्व अधोरेखित झाले तर मनसेच्या राजकीय वाटचालीतला तो महत्वाचा टप्पा होऊ शकतो. विशेष म्हणजे मनसेचा मोर्चा आणि हिंदुत्वाचा मुद्दा याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं तेव्हा त्यांची भूमिकाही काही वेगळी नव्हती. एकूणच हा मुद्दा आता राजकीय बनला आहे. आणि पुढच्या काळातल्या राजकारणासाठी तो टर्निंग पॉइंटही ठरू शकतो एवढं मात्र नक्की.....