www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतीदिन नुकताच झाला. जुने शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी आणि किस्से जाणतात. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे ठाकरे उत्सव...
शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यातर्फे आयोजित गोरेगाव इथं ‘ठाकरे उत्सव’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी मुलाखतकार सुधीर गाडगीळ शिवसेनानेते खासदार संजय राऊत, ‘मार्मिक`चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांची मुलाखत घेतली. यामुलाखतीतून तिघांनी बाळासाहेबांच्या विविध व्यक्तिमत्वांचे पैलू उलगडले.
यावेळी बोलतांना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘सामना’मधली बाळासाहेबांची मुलाखत घेणं म्हणजे माझ्यासाठी एक मेजवानीच असायची. बाळासाहेब नेहमी म्हणायचे थांब थोडे दिवस... जरा मालमसाला जमला की मग घे मुलाखत... नंतर त्यांची मी मॅरेथॉन मुलाखत घ्यायचो आणि ती मुलाखत मग ‘सामना’त छापून आली की धडाधड स्फोट व्हायचे. मग बाजारात प्रतिकिया काय? दिल्लीत वाहिन्यांवर दिसली का? आपण बोललो त्याचा परिणाम झाला आहे, अंक किती वाढला, हे माझ्याकडून आणि नंतर बाजीराव दांगट यांच्याकडून खात्री करून घेत असत, हा किस्सा संजय राऊत यांनी सांगितला.
शिवसेनाप्रमुखांना कोडी सोडविण्याचा नाद होता. एकदा त्यांना माजी उपराष्ट्रपतींचं नाव आठवत नव्हतं. तेव्हा मला फोन करुन विचारलं. मी सांगितलं की बस्सप्पा दानप्पा रेड्डी, त्यांना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर बोलावून त्यांनी मला २५ हजार रुपयांचं बक्षिस दिल्याची आठवण संजय राऊत यांनी सांगितली. शिवाय शरद पवारांशी माझे संबंध वाढतात, हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सांभाळून राहण्याचा सल्लाही बाळासाहेबांनी त्यांना दिला असल्याचं राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट हे नाव कधी मिळालं याचा किस्सा सांगतांना संजय राऊत म्हणाले, की १९९२मध्ये बाबरी मशीद पडली. तेव्हा ‘सामना’मध्ये भाजप बाबरी मशीद पडल्याची जबाबदरी घेत नाही, असं शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं. ते म्हणाले जर बाबरी मशीद शिवसैनिकांनी तोडली असेल, तर मला अभिमान आहे. त्यानंतर बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट नावारूपाला आले.
संजय राऊत यांच्यासोबतच ‘मार्मिक`चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनीही काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, बाळासाहेब म्हणायचे स्मरणशक्ती ही चावट आहे, तिची रोज मशागत कर. तिचा ग्रंथालयासारखा उपयोग कर, तिला लष्कराच्या सैनिकांसारखी शिस्त लावली पाहिजे. तर पत्रकारिता ही स्वतःसाठी, नावासाठी नाही, तर लोकांच्या प्रश्ना,साठी कर, शोधपत्रकारितेनं नाव मिळतं, पण लोकांचे प्रश्न मात्र सुटत नाहीत. वाचन करत जा, वाचकांना समजेल अशी सोपी भाषा वापरत जा, असं स्मरणशक्ती आणि पत्रकारिता यांचे बाळकडू त्यांनी दिले.
तर प्रभाकर वाईरकर शिवसेनाप्रमुखांची आठवण सांगताना म्हणाले, एकदा बाळासाहेबांकडे गेलो असताना प्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिंन्हाचा फोन आला. त्या वेळी त्याची हुबेहूब नक्कल करत शिवसेनाप्रमुखांनी त्याच्याशी पाच मिनिटं गप्पा मारल्या. एक मुलगी आणि तिचे वडील मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले तेव्हा कुंकवाचा करंडा त्या मुलीच्या हातात दिला. त्यांच्यासारखा जिवंत माणूस आपण पाहिला नाही, अशा शब्दात वाईरकरांनी त्यांचं स्वभाववर्णन केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.