www.24taas.com, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी सुषमा स्वराज यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आज आपली भूमिका बदलली... शिवसेनेनं अखेर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय. भाजपचा निर्णय घोषित होण्याआधीच मोंदींना आपला पाठिंबा जाहीर करण्यामागे शिवसेनेची नेमकी काय मजबुरी होती, याचा घेतलेला हा आढावा....
गुरुवारी रात्री उशिरा मातोश्रीवरचा फोन खणखणला. पलीकडे दुसरं कुणी नाही, तर होते चक्क भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे प्रमुख दावेदार नरेंद्र मोदी... आता फोन कशासाठी असणार, हे सर्वांनाच माहित आहे... या फोननंतर सारी सूत्रं हलली...आणि सक्काळी सक्काळी शिवसेनेनं मोदींना आपला पाठिंबा जाहीर केला...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका घेणं पक्षनेतृत्त्वाला कठीण बनलं होतं. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचार प्रमुखपद मोदींकडे आल्यानंतर शिवसेनेनं त्यांना शुभेच्छा दिल्या. पण उघडपणे पाठिंबा दिला नव्हता.
उलट या ना त्या निमित्ताने मोदींवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या `सामना`मधून वारंवार टीकास्त्र सोडण्यात येत होतं. शिवसेनेनं आपला मोदीविरोधाचा छुपा अजेंडा सुरु ठेवला होता... मात्र शिवसेनेला मोदींना पाठिंबा देण्याची उपरती अचानक कशी झाली? याचे कोडे सर्वांना पडलेय.
देशातील मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेकडे दुर्लक्ष करणं सध्याच्या घडीला केवळ अशक्य आहे... त्यात युवा मतदारांचा कलही मोदींकडे असल्याचं शिवसेनेलाही पटलं असावं... त्यामुळे लोकभावनेच्या विरोधात जाण्याचा धोका शिवसेनेनं पत्करला नाही... स्वतः युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मोदींशी सलोख्याचे संबंध आहे. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून त्यांचा एकमेकांशी संपर्क असतो. मोदी धूर्त राजकारणी असल्यानं त्यांना विरोध केल्यास ते डूख ठेवतील, असेही सेना नेतृत्वाला वाटले असावे.
भाजपमध्येही मोदींचे विरोधक कमी नाहीत. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यालाही मोदी आवडत नाहीत. पण अडवाणी गट दुबळा पडल्याने कदाचित शिवसेनेला मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करणे भाग पडले असावे, असं बोललं जातंय. मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचेही मोदींशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधानपदासाठी मोदी एकमेव लायक उमेदवार असल्याचं राज ठाकरे यांनी याआधीच जाहीर केलंय. कदाचित या मैत्रीचा राजकीय फटका शिवसेनेला बसू नये, यासाठी मोदींना पाठिंबा देण्याची गरज पक्ष नेतृत्वाला पडली असावी.
मातोश्रीवर कुणी आला आणि रिकाम्या हाती परतला, असं बाळासाहेबांच्या काळापासून कधी झालेलं नव्हतं. कदाचित नरेंद्र मोदींनी मध्यंतरी मातोश्रीवर घेतलेली भेट आणि गुरूवारी स्वतः केलेला फोन यामुळंच तर मातोश्रीचा आशीर्वाद त्यांना मिळाला असावा का?
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.