मुंबई : याकूब मेमनला फाशी ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याकूब मेमन हा मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोपी आणि बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड टायगर मेमनचा भाऊ आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज याकूब मेमनची शिक्षा कमी करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.
याकूब मेमन हा व्यवसायाने चार्टड अकाऊंटट होता. याकूब मेननने स्वत:ला वाचवण्याचा चांगला प्रयत्न केला, पण अखेर सत्य बाहेर आल्यानंतर त्याची शिक्षा कायम ठेवण्यात आल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
कोण आहे हा उच्चशिक्षित याकूब मेमन?
मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील आरोपी याकूब मेमन हा व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट. याच खटल्यातील प्रमुख आरोपी इब्राहिम मुस्ताक 'टायगर' मेमन याचा याकूब हा भाऊ. मेमन कुटुंबातील तो एकमेव सर्वात उच्चशिक्षित. बॉम्बस्फोटांनंतर याकूब मेमन कुटुंबीयांसह भारत सोडून फरार झाला.
याकून मेमनची शरणागती
१९९४ मध्ये तो भारतात परतला आणि त्याने शरणागती पत्करली. पश्चाताप झाल्याने आपण शरणागती पत्करल्याचे त्याने सांगितले होते. तसेच पाकिस्तानात आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते व मेमन कुटुंबीय तसेच दाऊद इब्राहिम याचा एन्काऊंटर करण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे, असेही त्याने कबूल केले होते. शरण आल्यापासून तो कारागृहात आहे. टायगर मेमन याचे दाऊदशी लागेबांधे होते तसेच सोने-चांदी तस्करीसह अनेक अवैध व्यवसाय होते.
याकूब मेमनवरील आरोप
टायगर मेमनच्या सर्व अवैध व्यवसायाचा आर्थिक कारभार हाताळण्यासाठी याकूब आपल्या अकौंटिंग फर्मचा उपयोग करीत असे.बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आर्थिक नियोजन करणे, कटात सहभागी असलेल्यांना आर्थिक पुरवठा करणे, त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था पाहणे, शस्त्र आणि दारूगोळाच्या प्रशिक्षणासाठी जाणाऱ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणे, बॉम्ब पेरण्यासाठी जाणाऱ्यांना वाहने उपलब्ध करून देणे अशा प्रकारची कामे करीत असे, असा त्याच्यावर आरोप आहे.
टाडा न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश पी. डी. कोदे यांनी २७ जुलै २००७ मध्ये मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी शिक्षा ठोठावली.
याकूबला फाशीची शिक्षा
गुन्हेगारी कट रचल्याबद्दल फाशी, कटासाठी आर्थिक व्यवस्था करणे, तसेच सहआरोपी मुलचंद शहा आणि फरारी भाऊ आयुब मेमन याच्या तेजरथ या फर्ममार्फत निधीचे वाटप करणे, कटासाठी मदत आणि सुविधा उपलब्ध करून देणे या आरोपाखाली टाडाच्या कलम ३ अंतर्गत जन्मठेप याकूबला ठोठावण्यात आली
आणखी काही आरोप
युवकांना शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी पाठविण्याकरता त्यांच्या विमान प्रवासाची तिकिटे उपलब्ध करणे, त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करणे, बॉम्ब पेरणाऱ्यांसाठी वाहने खरेदी करणे, अवैधरित्या शस्त्रास्त्रे व दारूगोळा बाळगणे आणि त्याची वाहतूक करणे या गुन्ह्यांखाली टाडाच्या कलम ५, ६ अंतर्गत १४ वर्षांचा सश्रम कारावास, जीविताला हानी पोहोचेल, अशा हेतूने स्फोटके बाळगल्यावरून स्फोटक पदार्थ कायद्यातील कलम ३, ४ आणि ६ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आदी शिक्षा याकबूला आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.