मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. निवडणूक आचारसहिंताही लागू झाली आहे.
या दोन्ही ठिकाणी पुढील महिन्यात ११ तारखेला मतदान होणार असून, १५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. आर. आर. पाटील यांचे मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातील विधानसभेची जागा रिक्त झाली होती. बाळा सावंत यांचेही दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. या दोन्ही जागांच्या पोटनिवडणुकीसाठी १७ ते २४ मार्च या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत.
२५ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. २५ ते २७ मार्च या काळात उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. त्यानंतर ११ एप्रिलला दोन्ही ठिकाणी मतदान होईल.
निवडणूक कार्यक्रम -
# १७ ते २४ मार्च २०१५अर्ज दाखल करण्यासाठी मुदत.
# २५ मार्च रोजी अर्जाची छाननी.
# २५ ते २७ मार्च पर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत.
# ११ एप्रिल ला मतदान
# १५ एप्रिलला मतमोजणी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.