BMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.  

Updated: Feb 4, 2015, 10:40 AM IST
BMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार? title=

मुंबई: देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे. यंदाचे बजेट सुमारे ३४ हजार कोटी रूपयांचे असण्याची शक्यता आहे. जकात आणि मालमत्ता कराचं उद्दीष्टय गाठण्यात अपयश येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे बजेट सर्वसामान्य मुंबईकरांसाठी काय घेउन येतोय, हे पाहाणं महत्वाचं ठरेल. मुंबईकरांवर  करांचा अतिरिक्त बोजा लादला जाण्याची शक्यता आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई... आणि याच मुंबईच्या महापालिकेचं २०१५-१६चं बजेट आज सादर केलं जाणार आहे. या बजेटमध्ये नेहमीप्रमाणे पायाभूत सुविधांवरही भर दिला जाणाराय. 

यामाध्ये प्रामुख्यानं काँक्रीट आणि डांबरी रस्त्यांचा समावेश तर आहेच शिवाय महत्वाकांक्षी कोस्टल रोडसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे.. गारगाई पिंजाळ प्रकल्पासाठीही भरीव निधी दिला जाणार आहे. जलबोगदे बांधकामाकडेही विशेष लक्ष दिलं जाणाराय.

या अर्थसंकल्पात 'राईट टु पी' या महिला शौचालयांच्या योजनेवर भर दिला जाणाराय. तसंच, डिजीटल शिक्षण प्रणाली निर्माण करण्याच्या योजनांवरही या अर्थसंकल्पात भर देण्यात येईल. मात्र, जकात कर आणि मालमत्ता कर वसूलीत झालेली घट यामुळं पालिकेच्या तिजोरीत येणारा पैशाचा ओघ कमी झालाय. याचा थेट परिणाम मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडण्यावर होउ शकतो. या वाढीव करांमध्ये यापूर्वीच प्रस्तावित केलेली पाणीपट्टीतील 8 % वाढ, मलनिस्सारण कर, स्वच्छता कर, अग्निशमन कर  तसंच प्रस्तावित मालमत्ता कर वाढीचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका बजेट खर्च करण्याच्या बाबतीत काठावर पास झाल्याचं दिसून येतं. २०१४-१५ च्या बजेटमध्ये तरतुद असणा-या एकूण रकमेपैकी पालिकेने आतापर्यंत फक्त ३५-४० टक्के एवढीच रक्कम खर्च केलीय. महापालिकेकडे ठेवींच्या रुपानं ४०,००० हजार कोटींची रक्कम असतांना मुंबईकरांवर करांचा अतिरीक्त बोजा टाकण्याची गरज नसल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलंय.

गेल्या बजेटमधल्या अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्याचं दिसून येतं. यामध्ये शिवआरोग्य सुरक्षाकवच योजना, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा थिंक टँक, चाईल्ड ट्रँकींग सिस्टीम सारख्या योजना आहेत. भरीव आर्थिक तरतूद असूनही या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

त्यामुळं नव्या योजना केवळ बजेटमध्ये मांडल्या जातात. परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाहीय. किमान यावेळी तरी अंमलात येणाऱ्याा योजना बजेटमध्ये असतील अशी आशा मुंबईकर करतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.