www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शॉपिंग मॉलमधल्या चेन्जिंग रुममध्ये कॅमेरे लपवून महिलांचे चित्रीकरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. परंतु, आता चक्क एका डायग्नॉस्टिक सेन्टरमध्ये एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलांचे चेन्जिंग रुममध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय.
पश्चिम मुलुंडमध्ये गावडे रोडवर असणाऱ्या एका डायग्नॉस्टिक सेन्टरमध्ये दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू होता. अन्सार शेख हा एक्स-रे ऑपरेटर गेल्या चार वर्षांपासून इथं काम करत होता. एक २६ वर्षीय महिला त्याच्या सेन्टरमध्ये आली असताना चेन्जिंग रूममध्ये या महिलेला एका प्लास्टिकच्या पिशवीत एक मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडमध्ये सापडला. त्या पिशवीला बरीचशी भोके होती
यानंतर या महिलेनं हा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातला. त्याने, डायग्नॉस्टिक सेन्टरमधील इतर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने या फोनच्या मालकाचा ठावठिकाणा लावला. थोड्याच वेळात हा मोबाईल अन्सार शेखचा असल्याचं उघडकीस आलं.
हा फोन एक्स-रे ऑपरेटरचा असल्याचं इतर कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर पहिल्यांदा अन्सारनं हा मोबाईल आपला नसल्याचं खोटं सांगण्याचा प्रयत्न केला. पण, कर्मचाऱ्यांनी त्याला तोंडावर पाडलं. त्यानंतर त्याने तो आपला फोन असल्याचे सांगत तो टचस्क्रीन फोन असल्याने कधी कधी आपोआप व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडवर जात असल्याची बतावणी केली.
यावेळी डायग्नोस्टिक सेन्टरमध्ये असेलल्या अन्सारच्या सहकाऱ्यांनी याबद्दल त्याला जाब विचारला. यावर महिलेच्या पतीनं पोलिसांची धमकी दिल्यानंतर आपलं भांडं फुटल्यामुळे गडबडलेल्या अन्सारनं यावेळी सहकारी नर्सवरच चाकूनं वार केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मुळच्या इगतपुरीच्या असलेल्या अन्सारवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्याचा हा प्रतापी मोबाईल फॉरेन्सिक विभागाकडे अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.