मुंबई : भाजपने शिवसेनेशी नाते तोडत राज्यात महायुती केली. या महायुतीत आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडली आहे. कोल्हापुरातील एका भागावर वर्चस्व असलेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने महायुतीत प्रवेश केला आहे. विनय कोरे यांनीच तशी घोषणा केली.
कोरे यांच्या प्रवेशाने भाजपप्रणीत महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत दाखल झाला आहे. त्यामुळे भाजप विनय कोरेचा वापर करुन पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करेल. 'जनसुराज्य'च्या साथीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनसुराज्य पक्षाला महायुतीत आणण्यासाठी पुढाकार घेतला. विनय कोरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे कोरे यांनी भेटीनंतर सांगितले.
भाजप कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्याशी आघाडी करणार आहे. महायुतीत भाजप, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि आता जनसुराज्य शक्ती हे पक्ष आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भाजप पक्ष कसा वाढेल यावर भर दिलाय. तसेच भाजपने कोल्हापुरातून खासदार संभाजीराजे भोसले यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवले. शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंग घाटगे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.