www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दैना झालेली पहायला मिळाली. रस्त्यावर गुडघाभर पाणी, वाहनांची गर्दी आणि रेल्वेचा खोळंबा अशी स्थिती मुंबईभर होती. याचा फटका अर्थात सर्वसामान्य नागरिकांनाच बसला. मात्र नेमकं या समस्येला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो.
पहिल्याच पावसानं मुंबईचा फज्जा झाला. मुंबईकरांच्या झालेल्या या दैनेला जबाबदार आहे ती मुंबई महापालिका. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचे छातीठोक दावे करण्यात आले..... पण पाऊस आला आणि त्यानं महापालिकेचे हे सगळे दावे खोडून काढले. आधी नालेसफाईचं पर्यटन करणारे नेते, मुंबईची ही अवस्था पाहण्यासाठी मात्र मुंबईत नव्हते. नालेसफाईबाबत समाधानी असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेशात आहेत. तर महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृह नेते यशोधर फणसे, बेस्ट कमिटीचे चेअरमन नाना आंबोले, भाजप नगरसेवक मनोज कोटक, भाजप गटनेता दिलीप पटेल, सुधार समिती अध्यक्ष राम बारोट, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम आणि इतर प्रशासकीय अधिकारी चीनच्या दौ-यावर आहेत. कच-यापासून वीजनिर्मिती कशी होते ते पाहण्यासाठी आणि पाणी परिषदेसाठी हे नेते गेलेत.
महापालिकेपाठोपाठ रेल्वेनंही मुंबईकरांच्या त्रासात भर घातली....मध्य, हार्बर लाईनबरोबरच वेस्टर्न रेल्वेच्या ट्रेन्सही 20 ते 25 मिनिटं उशिरा सुरू होत्या. त्यामुळं ऐन ऑफिसच्या वेळेतच सर्वसामान्य नागरिकांची अक्षरश: तारांबळ उडाली. दिवसभरात 117 रेल्वे रद्द करण्यात आल्या.
तर राज्य सरकारनंही पावसासाठीची खबरदारी घेतली नाही. वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार असलेल्या ईस्टर्न फ्री वेचं लोकार्पणच झालं नाही. त्यामुळे हा रस्ता केवळ देखावाच ठरला. हा रस्ता सुरू असता तर ईस्टर्न सबर्बवर झालेली वाहतुकीची कोंडीही टाळता आली असती. ही सगळी परिस्थिती उद्भवली ती पहिल्याच पावसात... आता अख्खा पावसाळा कसा जाईल, याचं हे फक्त ट्रेलर आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.