तृतीयपंथी बनून रहिवाशांना लुटणारी टोळी अटकेत

तृतीयपंथीयांचा वेष धारण करून रहिवाशांना लुटणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केलंय. राज्यात कुठे कुठे अशा लुटीच्या घटना घडल्यात याचा पोलीस आता शोध घेत आहेत..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 6, 2013, 09:25 PM IST

www.24taas.com, नागपूर
तृतीयपंथीयांचा वेष धारण करून रहिवाशांना लुटणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केलंय. राज्यात कुठे कुठे अशा लुटीच्या घटना घडल्यात याचा पोलीस आता शोध घेत आहेत..
रामनगर इथं राहणा-या दीप्ती चौबेंच्या हाती सध्या पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. सुशिक्षित असलेल्या दीप्ती चौबेंना अंधश्रद्धेवर विश्वास ठेवल्याची चांगलीच किंमत मोजावी लागली. तृतीय पंथीयांचे वेश धारण करून आलेल्या टोळीने ४ सोन्याच्या अंगठ्या, गोफ आणि बांगड्यांसह १४ हजारांची रोकड असा माल लंपास केलाय. तुमच्या घरातील भूतबाधा बाहेर काढून देतो असे सांगत दीप्ती यांना या चोरट्यांनी विश्वासात घेतले. त्यांच्या घरात पूजा केली. या पूजेत त्यांना सर्व सोन्याचे दागिने, रोख रक्कम एका कापडात घट्ट बांधून ठेवायला लावले. त्यानंतर तीर्थ म्हणून आपल्या जवळील गुंगीचे औषध टाकलेले पाणी प्यायला दिलं, आणि पोबारा केला.

रहिवाशांना लुटल्यानंतर ही टोळी आपल्या लॉज वर जाऊन थांबायची.या लॉजखाली रिक्षा लावणा-या गिरिधर देवांगला या तृतीयपंथीयांच्या वर्तनावर संशय आला. त्यामुळे त्याने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी गुजरात लॉजमधल्या टोळीला अटक केली. या टोळीतले भिकू परमार, महेश परमार, संदीप परमार आणि जितू परमार हे एकाच कुटुंबातले आहेत. पोलिसांनी लुटीच्या मालासह २ लाखांची रोकड त्यांच्याकडून जप्त केली.या टोळीचा संबंध इतर कुठल्या गुन्ह्यांबाबत आहे याचा तपास सध्या पोलीस करतायत.