www.24taas.com , झी मीडिया, गोंदिया
ई-जीवनसत्त्वाऐवजी हलगर्जीनं अॅसिटिक अॅसिडचे थेंब पाजल्यानं दोन बालकांच्या तोंडासह पोटातील भागही भाजल्याची संतापजनक घटना तिरोडा तालुक्यात घडली. इथल्या शेलोटपार गावी आयोजित आरोग्य शिबिरात हा धक्कादायक प्रकार घडला. दोन्ही बालकांवर नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिरोडा इथून २० कि.मी.अंतरावर शेलोटपार इथं केसलवाडा उपकेंद्रांतर्गत गुरुवारी शाळेत लसीकरण शिबिर सुरू होतं. आरोग्य सेविका वानखडे आणि सहायक सेविका वाघमारे गावातील बालकांना गोवर आणि ई-जीवनसत्त्वाच्या लसी देत होत्या. त्याचवेळी दीड वर्षीय मुस्कान दिनेश मेश्राम आणि अवघ्या नऊ महिन्यांच्या चक्रधर कन्हैया मेदे या चिमुरड्यांना ई-जीवनसत्त्वाऐवजी चुकून तिथं ठेवलेल्या अॅसिटिक अॅसिडचे थेंब पाजण्यात आले.
ही बाब लक्षात येताच दोन्ही बालकांवर तातडीनं प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. मात्र, तोंडात भाजलं गेल्यामुळं कायम अपंगत्व येण्याची शक्यता वर्तविली जातेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.