अखिलेश हळवे, नागपूर : ३१ मार्चला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून ५ कुख्यात कैदी फरार झाल्यानंतर निलंबित केलेले तत्कालीन तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना
मुदत संपल्यावरही अद्याप चार्जशीट दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
आला आहे.
३१ मार्चला कैदी फरार झाल्यावर त्याच दुपारी कांबळे यांना निलंबित करण्यात आले होते. पण कारवाई झालेल्या अधिकाऱ्याला ९० दिवसात चार्जशीट देण्यासंबंधीचे निकष सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्यानंतरही, ती प्रक्रिया अपूर्ण असण्याचा हा प्रकार म्हणेज शासकीय गलथानपणाचाच प्रकार म्हणावा लागेल.
३१ मार्चच्या पहाटे नागपूरच्या या मध्यवर्ती कारागृहातून ५ कुख्यात कैदी भिंत ओलांडून पाळले होते. फरार झालेल्या ५ पैकी ३ मकोकाचे आरोपी असल्याने या घटनेमुळे राज्यात हाहाकार माजला होता आणि सरकारहि हादरले होते.
राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याने या घटनेच्या काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्याची घोषणा सभागृहात केली होती. पण ती घोषणा हवेतच विरली का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, कारण या घटनेला आज पावणे-चार महिन्याचा कालावधी झाल्यावरही या संबंधीची चार्जशीट अद्याप कांबळे यांनी मिळाली नाही. नियमाप्रमाणे ९० दिवसाच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
इतकेच नव्हे तर ५ कैदी फरार आल्यावर आपल्यावर लावलेल्या आरोपांसंबंधी आपली बाजू मांडण्याची संधी देखील आपल्याला मिळाली नसल्याचे कांबळे म्हणाले. ५ फरार झालेल्या कैद्यांपैकी ४ कैदी परत सापडले असले तरीही ३ विविध विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असले तरीही अजून तपास पूर्ण झाला नसल्याचे ते म्हणाले. चार्जशीट ९० दिवसाच्या आत नाही दिली तर आरोप रद्द होतात आणि त्यामुळे आपल्याला सरकारी सेवेत परत सामावून घेण्यासंबंधी आपण मागणी केल्याचे ते म्हणाले. विदर्भाच्या दौऱ्यावर
आलेल्या तुरुंग शाखेच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर नागपूर
कारागृहाच्या पाहणी करता मात्र कधीच आल्या नसल्याचा आरोप देखील त्यांनी
लावला.
९० दिवस झाल्यावरही चार्जशीट दाखल न होणे हा येथील अधिकाऱ्यांच्या गलथानपणाचे उदाहरण आहे. नागपूरच्या या कारागृहातून ५ कैदी फरार झाल्याच्या घटने नंतर १५० च्या वर मोबाइल फोन सापडले होते. इतकी मोठी घटना घडल्यावारही अधिकाऱ्यांनी त्यातून धडा घेतला नाही असेच म्हणावे लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.