www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरातील अनाथ मुलींसाठी कार्य करणाऱ्या आधाराश्रम या संस्थेनं सोलर एनर्जीचा वापर करत इंधनबचतीचा आदर्श घालून दिला आहे. तब्बल दोनशे अनाथ मुलींचा स्वयंपाक अवघ्या दहा मिनिटात होतोय. याच स्वयपाकासाठी महिन्याकाठी तीस सिलेंडरचा खर्च पँराबोलिक सोलर सिस्टममुळे वाचत आहे. गॅस सिलिंडरच्या भडकलेल्या दरांमुळे राज्यातील आनंदवनसारख्या सामाजिक संस्थांसाठी निर्माण झालेल्या समस्येवर हा चांगला तोडगा ठरू शकतोय.
गच्चीवर असलेले हे मोठमोठे अर्धवर्तुळाकार आरसे... कुठल्या संशोधन केंद्रातील वा हवामान केंद्रात नव्हे तर हे आहेत नाशिकच्या आधाराश्रामातील... उष्ण वाफेचा उपयोग करून या आधाराश्रमातील स्वयंपाक शिजविण्यात येतो. अत्यंत निर्जंतुक स्वरुपात स्वयंपाक शिजवता येतो. आणि यासाठी बारा लाख रुपये खर्च आलाय. या सोलर एनर्जीमुळे दररोज तीन सिलिंडरची बचत होतेय. म्हणजेच महिन्याकाठी तब्बल दीड लाख रुपयांची बचत होणार आहे.
या संस्थेत एकशे चाळीस निराधार अनाथ मुलींचं पालनपोषण करण्यात येतं. शासकीय अनुदान,देणगीदार यांच्या सहकार्यातून नवीन गॅस सिलिंडरचा वापर करणं अवघड आहे. त्यामुळेच ओमप्रकाश कुलकर्णी यांच हे संशोधन आधाराश्रमासाठी वरदान ठरलंय. गॅस डिझेल पेट्रोल आणि वीजेसारख्या नैसर्गिक इंधन दिवसेंदिवस वापरामुळे कमी होणार आहे आणि त्यामुळे त्याचे भावही आकाशाला भिडणार आहे. त्यामुळेच आता सामाजिक संस्थांसोबत प्रत्येकानंच पर्याय शोधणं आवश्यक आहे.