www.24taas.com, नाशिक
सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शाळांमध्ये मुलभूत सोयी येत्या सहा महिन्यांत पुरवण्याचे आदेश दिलेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात... पाण्याच्या टाक्या आहेत पण, रिकाम्या...
शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून विद्यार्थ्यांना स्वतःच पाणी आणावं लागतंय. आपले गुरूजन आणि सवंगड्यांची तहान भागवण्यासाठी त्यांना हे कष्ट उपसावे लागतात. हे या शाळेतलं रोजचंच चित्र. पण झी 24 तासची टीम आल्याचं बघताच विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्यासाठी शिक्षकांची धावपळ झाली...
नाशिकपासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावाच्या शाळेची ही विदारक स्थिती... जिल्ह्यातल्या सर्वच शाळांची स्थिती कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी अर्थातच वास्तव लपविण्याची खटपट करतायत. शाळा हे ज्ञानार्जनाचं ठिकाण... मात्र सरकारी अनास्थेमुळं शिक्षण घ्यायचं सोडून विद्यार्थ्यांना भलतीच कामं करावी लागतायत. सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे देशभरातल्या अशा लाखो विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा दिलाय...