www.24taas.com, नवी दिल्ली
२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला यापूर्वी मिळालेली पदकंही परत करण्यास हे तयार झाले आहेत.
आंतरराष्ट्रीयऑलिम्पिक समितीच्या निर्णयाचा निषेध म्हणून बल्गेरियाचे कुस्तीवीर वेलेती यार्दानोव्ह आणि सागिद मुर्ताजालेव यांनी आपली पदकं परत केली आहेत. योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार यांनीही आपली पदकं परत करण्याचा विचार बोलून दाखवला आहे.
एका कार्यक्रमात योगेश्वर दत्त म्हणाला, “जर आमच्या पदक परत करण्याने कुस्तीला फायदा होणार असेल, तर आम्ही आमची पदकं परत करायला तयार आहोत. आम्ही आज जे काही आहोत, ते कुस्तीमुळे आहोत. कुस्ती बंद करण्याचा निर्णय हा आमच्यादृष्टीने निषेधार्ह आहे.
सुशील कुमार म्हणाला, “आम्ही नुकतंच कुस्तीमध्ये चांगलं नाव मिळवून दाखवलं होतं.य आणि आता कुस्तीलाच ऑलिम्पिकमधून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. आज अनेक तरुण आमच्याकडे पाहून या खेळामध्ये उतरले आहेत. कुस्ती खेळून ऑलिम्पिक पदकं मिळवण्याचं स्वप्न पाहात आहेत. आम्हाला त्यांची मदत करायची आहे.”