कैलास पुरी, www.24taas.co,पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड म्हटलं की अजितदादा हे समीकरण गेली कित्तेक वर्ष झाल रूढ झालंय... त्याचमुळ पिंपरी चिंचवडमध्ये अजित दादांचा शब्द प्रमाण मानला जातो. अजितदादांनी सिंचन प्रकल्पांमध्ये वाढीव खर्च झाल्याचा आरोप झाल्यानतर राजीनामा दिला. पिंपरीतही अनेक प्रकल्पांमध्ये असाच वाढीव खर्च झालाय. ही रक्कम ९०० कोटीपर्यंत जाते. त्यामुळं त्यांचा आदर्श इथले नेते घेणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
विकासाचं मॉडेल म्हणून अजितदादा पिंपरी-चिंचवडकडं पाहतात. शहराच्या विकासासाठी त्यांनी असंख्य प्रकल्प शहरात आणले. पण या प्रकल्पांची मूळ किंमत आणि होणारा खर्च यांच्यात प्रचंड तफावत आहे. पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याची योजना ५९४.३१ कोटी रुपयांची होती. पण या योजनेचा खर्च १९५. ९७ कोटींनी वाढत तो तब्बल ७९०.२८ कोटीपर्यंत पोहचलाय.
बीआरटी पहिल्या टप्प्यासाठी ३१२. १४ कोटी खर्च अपेक्षित होता... पण यामध्ये २२८ कोटी रुपयांनी वाढ होत तो ५४०.७८ कोटींवर पोहचला. त्याचप्रमाणं ४१३. ४५ कोटींची झोपडपट्टी पुनर्वसन योजना ६३६ कोटींवर तर घरकुल योजना २२८.०८ कोटींवरून ४८२ कोटी रुपयांवर पोहचली. शहरातल्या अशा सर्व प्रकल्पांमध्ये तब्बल ९०० कोटींची वाढ झालीय. प्रकल्पांच्या खर्चवाढीमागे भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप विरोधक करतायेत...
सत्ताधा-यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. प्रत्यक्ष काम सुरु होताना लागणारी किंमत आणि आताची वाढलेली किंमत. यामध्ये तफावत वाढल्यानं खर्च वाढल्याचं स्पष्टीकरण सत्ताधा-यांनी दिलंय.
सिंचन प्रकल्पांमधील वाढीव खर्च झाल्याचा आरोप झाल्यानं अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनतर राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या त्यागाचे गुणगान गातायेत. पण त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्याच धर्तीवर झालेल्या भ्रष्टाचारावर मात्र स्थानिक नेते शांत आहेत. दादांच्या त्यागाच्या गप्पा मारणा-या त्यांच्या समर्थकांनी किमान समाधानकारक उत्तरं तरी द्यावीत ही अपेक्षा.