www.24taas.com, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये असलेल्या भिक्षेकरी गृहाच्या अधीक्षकांसह दोघांना बडतर्फ करण्यात आलंय. या भिक्षेकरी गृहातल्या विदारक स्थितीचं वास्तव ‘झी 24 तास’नं उजेडात आणलं होतं. शिवाय इथल्या भिक्षेकऱ्यांना आता चांगलं जेवण आणि सोयी-सुविधा मिळू लागल्यात.
सोलापूरातल्या करमाळा तालुक्यात असलेलं भिक्षेकरी गृह... वारंवार कारवाई केल्यानंतरही जे भिक्षा मागताना पकडले जातात, त्यांना या ठिकाणी पाठवलं जातं. मात्र, निकृष्ट दर्जाचं अन्न आणि अपुऱ्या सुविधांमुळे गेल्या दोन वर्षांत इथं तब्बल दीडशे भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला होता. ‘झी 24 तास’नं स्टिंग ऑपरेशन करून हे विदारक सत्य उजेडात आणल्यानंतर राज्य सरकारनं कारवाई सुरू केली होती. या अंतर्गत इथले प्रभारी अधीक्षक पाटील आणि भांडार व्यवस्थापक बाले यांना बडतर्फ करण्यात आलंय.
या प्रकरणी चौदा जणांना कारणं दाखवा नोटीसही बजावण्यात आलीये. ‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर आता या भिक्षेकरी गृहात चांगल्या सोयी दिल्या जाऊ लागल्यात. अन्नाचा दर्जाही सुधारलाय. तसंच इथं प्रथमिक आरोग्य केंद्रही सुरू करण्यात आलंय.