www.24taas.com, सांगली
सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाचे आदेश मानत नसल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिलीय.
याच संदर्भात आज राष्ट्रवादी कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षनेत्यांचे निर्देश डावलून नायकवडी यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा झाला होता. राष्ट्रवादी पुरस्कृत विकास महाआघाडीचे नायकवडी हे महापौर आहेत. पण महापौर झाल्यापासून ते नेत्यांचे ऐकत नाहीत, अशी तक्रार होत होती. ‘झी २४ तास’नं अशा शाही विवाहांचा सातत्यानं पाठपुरावा केला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनं या शाही विवाहाची दखल घेत नायकवडींची पक्षातून हकालपट्टी केलीय.
नायकवडींनी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहात मनपा कर्मचाऱ्यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. या विवाह सोहळ्यात तब्बल २७०० किलो मटनाचे शाही महाभोजन देण्यात आलं होतं. तसंच ३५ ते ४० हजारांच्या पंगती उठल्या आणि तेवढ्याच बिसलरीच्या बाटल्याही रिकाम्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीवर चांगलीच टीका झाली होती.
महापौर : पक्षाच्या डोक्याला ताप
महापौर नायकवडी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्याचा आदेश नेत्यांनी दिला होता त्यांनी तो मानला नाही. ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात बंड करून त्यांनी महापालिकेतील सत्तेला शह दिला. काँग्रेस आणि भाजपच्या बळावर कारभार सुरू केला. त्यामुळे मंत्री पाटील समर्थकांनी महापौरांना राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली. प्रदेश समिती नेत्यांकडे आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे नायकवडी यांना चार महिन्यांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय झाला.
महापौरांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. ते काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन कार्यक्रम करतात. काँग्रेस आणि भाजपला सोबत घेऊन कारभार करतात. त्यांच्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होते आहे. तेव्हा त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी करणारा प्रस्ताव शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी प्रदेशला सादर केला होता. त्याला प्रदेश समितीनेही त्याला नुकतीच मान्यता दिली होती.