www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय. अण्णांच्या लढ्याला मिळालेलं हे अभूतपूर्व यश आहे. असं म्हटलं जातंय. संपूर्ण राळेगणसिद्धीमध्ये - अण्णांच्या उपोषणाच्या ठिकाणी - एकच जल्लोषाचं वातावरण आहे. लोकपाल विधेयक संमत झाल्यानंतर अण्णांनी अखेर आठ दिवसांनंतर आपलं उपोषण सोडलंय.
लोकपाल विधेय संमत झाल्याबद्दल अण्णांनी `सिलेक्ट कमिटी`चे आभार मानलेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर व्हावं, असंही अण्णांनी म्हटलंय.
`राज्यसभेत गेल्यानंतर सिलेक्ट कमिटीनं या विधेयकात आणलेल्या सुधारणा प्रशंसनीय आहे... त्यामुळेच हे लोकांना हवं असलेलं बील लोकसभेतही पास झालंय... गेल्या वर्षभरापासून आम्ही या विधेयकासाठी लढा दिला. सगळ्या देशालाच या विधेयकाची आवश्यकता होती` असं अण्णांनी यावेळी म्हटलंय.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल राळेगणसिद्धी परिवाराचे अण्णांनी विशेष आभार मानलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.