www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे महापालिकेची जागा खासगी शिक्षण संस्थेच्या घशात घालण्याचा घाट पालिका आयुक्तांनी घातलाय.याबाबतची परवानगी मिळवण्यासाठी आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात आयुक्त महेश पाठक यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलाय.
पुण्याच्या येरवड्यातील हा भूखंड क्रमांक ७९ शैक्षणिक कारणासाठी आरक्षित आहे. हा भूखंड कुठल्याही संस्थेस देताना त्याचं मुल्यांकन रेडी रेकनरनुसार करावं असा ठराव महापलिकेच्या मुख्य सभेनं एप्रिल २०१३मध्ये केला होता. मात्र या ठरावाकडे दुर्लक्ष करून भूखंड पुण्यातल्या बिशप शाळेला ९९ वर्षांच्या करारानं देण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्यसभेनं केल्याची माहिती आयुक्त महेश पाठक यांनी मुख्यमंत्र्यांना कळवली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे ज्या दिवशी पालिकेची मुख्य सभा झालीच नाही, त्या दिवशी हा ठराव संमत झाल्याचं शासनाला कळवण्यात आलंय. आयुक्तांनी वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप बापूराव कर्णे गुरुजी यांनी केलाय. रेडी रेकनर नुसार या जागेची किंमत २९ कोटी १८ लाख ४० हजार रुपये होत असताना आयुक्तांनी मात्र हेच मुल्यांकन केवळ ४ कोटी १३ लाख १७ हजार रुपये असल्याचं कळवलं आहे.
पालिकेच्या मुख्य सभेची मान्यता न घेता महापालिका आयुक्तांनी ही जागा बिशप शाळेला देऊ केलीय. त्यातही सुमारे २५ कोटीचं नुकसान होणार आहे. या संपूर्ण विषयाचा खुलासा आयुक्तांनी करणं आवश्यक आहे. मात्र सध्या ते विदेश दौऱ्यावर आहेत. आता परत आल्यावर का होईना ते या आरोपांवर स्पष्टीकरण देतात का, की नेहमीप्रमाने याही विषयावर मौन बाळगतात याकडे लक्ष लागले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.