www.24taas.com, मुंबई
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.
विधीमंडळात सर्वपक्षीय आमदारांनी पोलिस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचे स्पष्टीकरण देण्यासाठी आमदारांनी विधीमंडळाबाहेर पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी राम कदम यांनी हे स्पष्टीकरण दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माझा पक्ष सदैव पोलिसांच्या पाठिशी आहेत. विधानसभेत अनेक वेळा मुंबईच्या पोलिसांच्या बाबतीत आवाज मी आवाज उठवला असल्याचे राम कदम यांनी सांगितले. सीएसटीला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राज ठाकरे यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनीही आपल्या भाषणात पोलिसांची बाजू घेतली होती. त्यामुळे आम्ही पोलिसाच्या विरोधात नाही. परंतु, संबंधित पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपार्ह इशारे केले आणि उर्मट भाषा ही कायम ठेवली.
आज दुपारपासून वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या हे अर्धसत्य आहे. मनसे हा पोलिस अधिकाऱ्यांवर हात उगारणारा पक्ष नाही. मी तर हात उचललाच नाही. दुसरं म्हणजे विधान परिषदेचे अध्यक्ष वसंत डावखरे यांनी त्या अधिकाऱ्याला बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याची उर्मट भाषा कायम होती. त्यावेळी क्षितिजने स्वतःहून माघार घेण्याची भूमिका घेतली होती. पण अधिकाऱ्याने सांगितलं, की तुला काय उखाडायचं ते उखाडून घे. अशी अश्लिल भाषा वापरून क्षितिज ठाकूर यांनी चिथावण्याचा प्रयत्न केल्याचे राम कदम यांनी सांगितले.
विधान सभा हे सार्वभौम आहे. त्याचा आम्ही सर्व आमदार सन्मान करतो. लोकशाही मार्गाने क्षितीज ठाकूर यांनी विधानसभेत हक्कभंग ठराव सादर केल्यानंतर सभागृह तहकूब झालं. सभागृह तहकूब झाल्यानंतर ज्या अधिकाऱ्याविरोधात हक्कभंग मांडतो, तो बालकनीत बसला होता. त्यानंतर त्याने आमदारांना शिवीगाळ केली आणि आमदारांना अश्लिल इशारे केले. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याने मला धक्काबुक्की केली त्यात मी जमिनीवर पडल्याचे राम कदम यांनी यावेळी सांगितले.
टीव्हीवर दाखविण्यात येते की ४-५ आमदारांना पोलिसांना मारहाण केली. पण ही बातमी चुकीची आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फूटेज सभागृह अध्यक्षांकडे आहे. ते मीडियाने पाहावे. यावेळी ४०-५० जणांना जमाव होता. त्या जमावाची रेटारेटी झाली. ज्यांचे चेहरे लोकांना माहिती आहेत. त्याच आमदारांचे नाव मीडियामध्ये आल्याचे राम कदम यांनी सांगितले.