www.24taas.com, नवी दिल्ली
रिलायन्स उद्योगाचं भलं करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राजकीय पक्ष हातात हात घालून उद्योगपती मुकेश अंबानी यांना मदत करीत आहेत. काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान झाले आहे. मुकेश अंबानींच्या इशाऱ्यावर देशातील सरकार चालत आहे. सरकारने रिलयान्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला आहे. गॅस दरवाढविण्यासाठी गॅस उत्पादन निम्म्यावर आणलं गेलं आहे आदी गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
उद्योगपती आणि राजकारणी यांच्यातील संबंध उघडकरणारे दोन ऑडिओ टेप टीम अरविंद केजरिवाल यांनी आज देशाच्या समोर आणले. त्यामुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचारावर नवा खुलासा आज ऑडिओ टेपच्या माध्यमातून पुढे आला. या देशाचं सरकार कुठलाही पक्ष चालवत नसून रिलायन्स उद्योग देशाचं सरकार चालवत आहे. एवढेच नाही तर काँग्रेस हा पक्ष रिलायन्सचा दलाल असल्याचाही खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी केला. यापूर्वी सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा आणि भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना गोत्यात आणल्यावर केजरीवाल यांनी रिलायन्स आणि काँग्रेसच्या व्यवहारांवर टीकास्त्र सोडलं.
आज सुरुवातीला त्यांनी नीरा राडिया आणि रंजन भट्टाचार्यांची टेप ऐकवली. रंजन भट्टाचार्य हे अटलबिहारी वाजपेयींच्या मानसकन्येचे पती होय. केंद्रीय मंत्रीमंडळात कोण हवे यासाठी सेटिंग झाले होते. रिलायन्सने मंत्र्यांना आर्थिक मदत केली होती. जयपाल रेड्डींनी रिलायन्सच्या मनमानीला विरोध केला होता. तसेच रेड्डींनी रिलायन्स कंपनीपुढे झुकण्यास असमर्थतता दर्शविली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात आलं. तसंच त्यांनी रिलायन्सला ७००० कोटींची नोटीस बजावली होती. त्यामुळेच जयपाल रेड्डींचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला गेला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.
दरम्यान, मुरली देवरा यांनी त्यांच्या काळात पदावर असताना रिलायान्सचा प्रस्ताव तात्काळ मंजूर केला. रिलायन्समुळे देशाचं ४५ हजार कोटीं रूपयांचं नुकसान झालं आहे. अंबानींच्या मनासारखा देश चालवला जातोय असा खळबळजनक आरोप केजरीवालांनी केला आहे. सरकार रिलायन्सचं एजंट आहे. अंबानींपुढे पंतप्रधान मनमोहन सिंग हतबल आहेत. सरकारने रिलायन्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला. २००१पासून रिलायन्स मनमानी सुरू आहे. काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान आहे का? असा रोखठोक सवालही केजरीवाल यांनी विचारला.