www.24taas.com, मुंबई
रविवारी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमधून संन्यास घेण्याचा निर्णय शचिन तेंडुलकरने घेतल्यावर क्रिकेटमधील विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया जाहीर केल्या.
“मला वाटलं होतं, की सचिन पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळेल. पण त्याचा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. हा निर्णय त्याचा स्वतःचाच असावा. सिलेक्टर्सनी त्याच्यावर दबाव आणला असेल, असं वाटत नाही.” असं मत भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली याने व्यक्त केलं आहे.
सचिन तेंडुलकरच्या या निर्णयाने माजी भारतीय कॅप्टन श्रीकांतदेखील आश्चर्यचकीत झाला आहे. “वन-डे क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन करत असतानाच सचिनने निवृत्ती जाहीर केली. टेस्ट क्रिकेटलाही तो अशाच वेळी निरोप देईल, जेव्हा तेथे त्याचं प्रदर्शन जबरदस्त असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये त्याचं प्रदर्शन चांगलं असेल.”
“१९९२चा वर्ल्ड कप असो किंवा २०११ चा वर्ल्ड कप.. सचिनने पाकिस्तानविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानशी खेळण्यापूर्वीच त्याने निवृत्ती घ्यायला नको होती.” असंही श्रीकांत म्हणाला.
याशिवाय माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि बापू नाडकर्णी यांनाही सचिनच्या वन-डे क्रिकेटमधील निवृत्तीचं नवल वाटलं.
सचिनच्या वन-डे क्रिकेटमधील निवृत्तीवर हरभजन सिंगने ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, “मास्टर.. ४६३ मॅचेस, २३ वर्षं, १८४२६ रन्स!!! कुठलाच क्रिकेटर या रेकॉर्डच्या जवळपासही पोहोचू शकत नाही. सचिनला त्रिवार सलाम. सचिन महान क्रिकेटपटू आहे. महान व्यक्ती आहे आणि माझा खुप चांगला मित्रही आहे. भारतीयांना अभिमान वाटावा असा सचिन आहे. भारताच्या या खऱ्या पुत्राला माझा सलाम आणि खूप खूप प्रेम”
माजी क्रिकेट कप्तान आणि सध्याचे समालोचक रमीझ राजा याने सचिनच्या निर्णयाचं स्वागत करताना आपण त्याच्या भावना समजू शकतो. राजा म्हणाले, “मी समजू शकतो की २३ वर्षं आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्याहत क्रिकेट खेळल्यावर तुम्हाला वन-डे क्रिकेटमधील कुठलीच गोष्ट आकर्षक वाटटेनाशी होते. सचिनने सर्व गोष्टी अचिव्ह केल्या आहेत. त्याने वर्ल्ड कप जिंकला. १०० शतकं पूर्ण केली. आता वन-डे क्रिकेटमध्ये त्याने करण्यासारखं फारसं काही उरलंच नाही. त्यामुळे सचिनचा निर्णय रास्त आहे.”