रिओ-द-जिनेरिओ: अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
मारियो गोट्झानं 113 व्या मिनिटात आंद्रे शर्लेच्या पासवर गोल झळकावत जर्मनीच्या टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या या मॅचमध्ये जर्मनीनं अर्जेन्टाईन टीमवर 1-0 नं मात करत वर्ल्ड कप विजयाला गवसणी घातली. फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन धर्तीवर युरोपियन टीम चॅम्पियन बनली.
रेफ्रींनी फायनल व्हिसल वाजवली. आणि जर्मनीच्या टीमनं रिओ डी जनेरोच्या मकाराना स्टेडियमवर सुरु केला एकच जल्लोष. ज्या क्षणाची 24 वर्ष जर्मनीच्या फुटबॉल फॅन्सनी आतूरतेनं वाट पाहिली होती. तो क्षण अखेर मारियोनं गोल्डन गोल झळकावत आपल्या फॅन्सना दिला. जर्मनीच्या प्रत्येक फुटबॉलरच्या चेहऱ्यावर विजेतेपदाचा आनंद ओसंडून वाहत होता. 90 मिनिटं दोन्ही टीम्सना गोल करण्यात अपयश आलं होतं. मॅचमध्ये दोन्ही टीम्सनं अफलातून खेळ केला.
अर्जेन्टाईन टीमच्या डिफेन्सचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे. त्याचप्रमाणे अर्जेन्टाईन गोलकीपर सर्जियो रोमेरोनंही जर्मनी टीमचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. मात्र, मॅचच्या 21 व्या मिनिटाला गोन्झालो हिग्वेनला गोल करण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र, त्याला अर्जेन्टीनाला आघाडी मिळवून देता आली नाही आणि त्याची ही चूक अर्जेन्टीनाला चांगलीच महागात पडली. हिग्वेननं यानंतर गोल झळकावला खरा मात्र रेफ्रींनी तो ऑफसाईड ठरवला.
लिओनेल मेसीची जादूही या मॅचमध्ये पाहायला मिळाली नाही. त्याला आपल्या टीमसाठी फायनल मॅचमध्ये गोल करता आला नाही. निर्धारित 90 मिनिटांमध्ये दोन्ही टीम्सना गोल करता आला नाही आणि मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. एक्स्ट्रा टाईमच्या पहिल्या 15 मिनिटातही दोन्ही टीम्स गोल करू शकल्या नाहीत. यानंतर ब्रेकमध्ये दोन्ही टीम्सच्या गोटात स्ट्रॅटेजी ठरवल्या जात होत्या.
जर्मनीचे कोच जोकिम लो यांनी मारियो गोट्झाला यावेळी गुरुमंत्र दिला. आणि लो यांचा तोच कानमंत्र यशस्वी ठरला. गोट्झानं गोल झळकावत आपल्या कोचचा विश्वास सार्थ ठरवला. गोट्झानं अफलातून गोल करत आपल्या टीमला विजय साकारुन दिला. या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा सबस्टिट्यूट फुटबॉलरच टीमसाठी विजयाचा शिल्पकार ठरला. गोट्झाला पास देणारा आंद्रे शर्लेही सबस्टिट्यूट फुटबॉलरच होता. अनेक नाट्यमय घडामोडी या मॅचमध्ये घडल्या. मात्र, अखेर विजय झाला तो वेल डिझर्विंग अशा जर्मन टीमचा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.