दुबई : 2017 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून भारत आपलं नाव मागे घेऊ शकतो अशी धमकी बीसीसीआयनं आयसीसीला दिली आहे. दुबईमध्ये झालेल्या आयसीसीच्या फायनान्स कमिटीच्या बैठकीला बीसीसीआयला बोलावलं नसल्यामुळे बीसीसीआय नाराज झाली आहे, त्यामुळे ही धमकी देण्यात आल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.
या बैठकीला बीसीसीआयला न बोलावणं चुकीचं असल्याचं बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. या प्रकाराबाबत आम्ही आयसीसीशी चर्चा करु. आयसीसी जर ऐकली नाही तर काय करायचं याचा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शिर्केंनी दिली आहे. योग्य निर्णय झाला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायचं का नाही याचाही विचार करु, असा इशाराच शिर्केंनी दिला आहे.