मुंबई : बंगळूरच्या एबी डिव्हिलर्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानावर ५९ चेंडूंत १३३ धावा ठोकल्या. एबी डिव्हिलर्सला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिल्याने बंगळूरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे जवळपास अशक्य आव्हान उभे केले.
बाद फेरीमध्ये स्थान पटकाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबईच्या संघाला डिव्हिलर्स-कोहली जोडीने चांगलाच धक्का दिला.
नाणेफेक जिंकून कोहलीने फलंदाजी स्वीकारली. चौथ्याच षटकात धोकादायक ख्रिस गेल केवळ १२ धावा करून बाद झाला. त्यावेळी बंगळूरची धावसंख्या केवळ २० होती. यामुळे बंगळूरच्या धावसंख्येला वेसण घालता येईल, अशी मुंबईची अपेक्षा होती. मात्र, डिव्हिलर्स आणि कोहली यांनी सुरू केलेला धडाका डाव संपल्यानंतरच थांबला.
या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद २१५ धावांची भागीदारी केली. कोहलीनेही चांगली साथ देत ५० चेंडूंत ८२ धावा केल्या. डिव्हिलर्स आणि कोहली या दोघांनी मिळून या डावात २५ चौकार आणि ८ षटकार खेचले. लसिथ मलिंगा वगळता मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाला डिव्हिलर्स-कोहलीने धुवून काढलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.