चंदीगड : आमिर खानच्या 'असुरक्षित देश सोडून जाण्याच्या' वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका होतेय. या वादात आता 'फ्लाईंग शिख' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅथलिट मिल्खा सिंग यांनीही उडी घेतलीय... आमिरकडून थोडं जास्तच झालं, अशी भावना त्यांनी बोलून दाखवलीय.
बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं देशातील असहिष्णू परिस्थितीवर भाष्य करत या देशात असुरक्षित वाटत असल्याची एका वेळची आपल्या पत्नीची भावना जाहीर बोलून दाखवली... आणि एकच गहजब उडालाय. देशात असहिणष्णूतेच्या मुद्यावर अनेक लेखक, कलाकार आणि इतिहासकांरानी पुरस्कार परत केल्यानंतर अभिनेता आमिर खाननं देशातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. 'देशात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे चिंतीत आहे... पत्नी किरण रावनं तर आपल्याला देश सोडण्याचाही सल्ला दिला होता' असंही यावेळी त्यानं म्हटलंय. त्यावर मिल्खा सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की ‘आमिर खाननं केलेलं वक्तव्य मी वाचलं, पण मला वाटतं की हे काही अतिच झालं’.
पुरस्कारवापसीच्या विषयावर बोलताना 'भारतासारख्या देशात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे विरोध करू शकता. असहिष्णूतेच्या मुद्द्यावर विरोध करण्यासाठी पुरस्कार परत करणं हा योग्य मार्ग नसल्याचं मतही मिल्खा सिंह यांनी व्यक्त केलंय. ‘पुरस्कार परत करण्यामागे काय विचार आहे? असं केल्यानं कुणाचा काय हेतू साध्य होईल?' असेही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.
'जर आज मीही माझा पद्मश्री हा पुरस्कार परत करण्याची गोष्ट केली तर माझा मुलगा ही असंच म्हणेल... पुरस्कार परत करुन काय मदत होईल आणि व्यवस्था कशी सुधारेल? जर तुम्हाला कोणत्याही गोष्टींवर विचार व्यक्त करायचे असतील तर त्याला पुरस्कार परत करणं, हे उत्तर असू शकत नाही. सरकारनं तुमचं काम बघून तुम्हाला पुरस्कार दिला आहे. जर तुम्ही तो परत केला तर सरकारवर याचा कसा परिणाम होईल' असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.