मुंबई : जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयकडे कोहलीनं ही मागणी केलीय. भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयला २०१६-१७ या वर्षात तब्बल ५०९.१३ करोड रुपयांचा नफा झालाय.
ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सीरिज जिंकल्यानंतर विराट कोहलीनं ही मागणी केलीय. यासाठी त्यानं टीममधल्या सीनिअर खेळाडुंशी बातचीत केल्यानंतर समितीची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय.
समितीनं मात्र नुकत्याच झालेल्या करारात मानधन दुप्पट करण्यात आल्याचं म्हटलंय. या करारानुसार, ए ग्रेड क्रिकेटर्सना दोन करोड रुपये मिळतात. यामध्ये विराट कोहली आणि माजी कॅप्टन एम एस धोनी यांचा समावेश आहे. तर ग्रेड 'बी'च्या क्रिकेटर्सना एक करोड आणि ग्रेड 'सी'च्या क्रिकेटर्सना ५० लाख मिळतात.
यावर कोहलीनं आपण आणि सहखेळाडू या कॉन्ट्रॅक्टवर असामाधानी असल्याचं म्हटलंय. ग्रेड ए साठी पाच करोड, ग्रेड बीसाठी तीन करोड आणि ग्रेड सी साठी दीड करोड रुपये मानधन असावं, अशी मागणी कोहलीनं पुढे रेटलीय.
कोहलीच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटर्स १०-१२ करोड रुपये कमावतात. यामध्ये रिटेनरशिप आणि मॅच फीचाही समावेश आहे.