www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आता चॅटिंग करताना तरुणांना अधिक सावध व्हावं लागणार आहे. एखाद्या मुलीला किंवा महिला प्रतिसाद देत नसतानाही तुम्ही ऑनलाईन चॅटिंग करत राहिलात, तर तुम्हाला तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. कारण भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ मध्ये केलेल्या सुधारणेमुळे आता एकतर्फी चॅटिंग गुन्हा ठरणार आहे.
फेसबुक, ट्विटर, जी टॉकसारख्या चॅटिंग साईट्सवर जर एखाद्याने प्रतिसाद मिळत नसतानाही चॅटिंग सुरूच ठेवलं, तर तो विनयभंग मानला जाणार आहे. आत्तापर्यंत महिलांच्या इच्छेविरुद्ध तिचा पाठलाग केल्यास, तिच्याशी बोलायचा प्रयत्न केल्यास तसंच कॉल अथवा एसएमएस केल्यास तो विनयभंगाचा प्रकार मानला जातो. त्याचप्रमाणे आता एकतर्फी वाह्यात चॅटिंगलाही या यादीत सामिल करत प्रतिसाद न मिळतानही सुरू ठेवलेल्या चॅटिंगला विनयभंग मानलं जाणार आहे.
या गुन्ह्यासाठी तीन ते पाच वर्षं तुरुंगवास आणि आर्क दंड अशी कारवाईची तरतुद केली गेली आहे. यामुळे महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी ऑनलाईन बोलण्याचा प्रयत्नही तरुणांना महागात पडणार आहे. या कायद्यामुळे चॅटिंगमधून चालणारी छेडछाड रोखली जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.