नाताळासाठी रम्य कोकण ठरतंय ‘हॉट स्पॉट’

नाताळ, विकेन्ड आणि थर्टी फर्स्ट असा तिहेरी योग जुळून आल्यानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केलीय.

Updated: Dec 25, 2012, 08:34 AM IST

www.24taas.com, मुंबई
नाताळ, विकेन्ड आणि थर्टी फर्स्ट असा तिहेरी योग जुळून आल्यानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केलीय. कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांसाठी हॉट फेव्हरेट ठरत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी झालीय. पर्यटन आणि तिर्थाटन असा दुहेरी संगम साधण्यावरही पर्यटकांचा भर दिसतोय. पर्यटक कोकणातल्या तिर्थस्थळांनाही भेटी देतायेत. कोकणातल्या गणपतीपुळे, हरिहरेश्वर, मार्लेश्वर अशा तिर्थस्थळांवर गर्दी झालीय.
नाताळाची सुट्टी म्हटलं की गोव्याला जायचं.. असा ट्रेंड काही वर्षापर्यंत असायचा मात्र आता हा ट्रेंड बदलत चाललाय. नाताळाच्या सुट्टीत आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी आता लाखो पर्यटक कोकणात जातात. ‘एमटीडीसी’चे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुकींग फूल झाले आहे. गेल्या दोन दिवसात ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तीन लाख पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. एमटीडीसीबरोबरच खासगी हॉटेल्सही फूल झाली आहेत. गणपतीपुळे, हरणे, मुरुड, गुहागर, भाट्ये या ठिकाणी तर पुढील पूर्ण आठवडा पर्यटकांना राहण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीय.
एका क्लिकवर होणारे हॉटेल्सचे ऑनलाईन बुकींग, विविध महोत्सव, सरकारच्या विविध माध्यमातून झालेली प्रसिध्दी आणि कोकणाचे आदरतिथ्य अशा अनेक कारणांमुळे देशाच्या विविध भागातून पर्यटकांचा ओघ वाढत चाललाय तर स्वच्छ समुद्रकिनारे, डॉल्फिन सफारी, वॉटर स्पोर्टस, पॅरासेलिंग असा थरारही पर्यटकांना कोकणाकडे खुणावतोय.

नाताळाच्या सुटीत आणि नवीन वर्षाची धूम साजरी करण्यासाठी शांत आणि निसर्ग रम्य कोकणाला पर्यटक आता अधिक पसंती देऊ लागलेत. म्हणूनच कोकणातला तरुणही पर्यटनाकडे व्यवसायाच्या दृष्टीन गांभिर्याने पाहू लागलाय आणि म्हणतोय ‘येवा कोकण आपलाचं असा…’