www.24taas.com, मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विधानसभेत सर्वपक्षीय बहिष्कार सुरूच आहे. विरोधकांनी ‘क्लेश’ आंदोलन सुरू केले आहे. ज्यावेळी अजित पवार बोलायला उभे राहिले त्यावेळी विरोधी आमदारांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे सभागृहातील विरोधी बाके अचानकपणे रिकामी झालीत. या रिकाम्या बाकांकडे बघून अजित पवार खाली बसलेत.
‘उजनीत धरणात पाणी नाही मग मुतू काय? या बेताल वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली. सर्वत्र अजित पवारांचा निषेध करण्यात आला. शिवसेना, भाजप आणि मनसेसह शेतकरी संघटनेने तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यानंतर कराडमध्ये रविवारी अजित पवार यांनी एक दिवसाचे आत्मक्लेश उपोषण केले. त्यानंतर मंगळवारी विरोधकांनी त्यांच्या विरोधात क्लेश आंदोलन विधानसभेत सुरू केले. अजित पवार हे सभागृहात बोलण्यास उभे राहिले तेव्हा शिवसेना-भाजप युतीसह मनसे हे विरोधक ‘दादां’शी अबोला ठेवत सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले.
विधानसभेतील सभागृहातील विरोधी बाके अचानकपणे रिकामी झाल्याने विधानसभेतील अहवालांच्या मूल्यांच्या अनुषंगाने बोलणारे अजित पवार त्यांचे बोलणे अर्धवट ठेवून थांबले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य मंत्री एकमेकांकडे बघू लागले. अजित पवार खाली बसताच विरोधी आमदार जागेवर येऊन बसले. या त्यांच्या अघोषित आंदोलनाची कोणतीही घोषणा झालेली नव्हती. सकाळी सभागृह सुरू होताच शिवसेना आमदार गळ्यात काळी रिबन बांधून आले होते. शिवसेना-भाजप, मनसे या विरोधकांनी पवार यांच्या आत्मक्लेश उपोषणाचा मुद्दा उठवला होता. मात्र त्याला अध्यक्षांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी अजित पवारांवर अबोला धारण केला.
अजित पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे आत्मक्लेश आंदोलन केले. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील आणि दुष्काळग्रस्त जनतेला मोठा क्लेश झाला आहे. म्हणून विरोधकांचे अजित पवार यांच्या विरोधातील हे ‘क्लेश’ आंदोलन आहे, असे भाजपचे सुधीर मुनगंटीवार सांगितले.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी अजित पवार यांच्या आत्मक्लेश उपोषणाची नौटंकी म्हणून खिल्ली उडविली. पवार यांचे आत्मचिंतन आणि आत्मक्लेश कशासाठी हे जनतेला समजले पाहिजे. अशी नौटंकी करून यशवंतरावांचे विचार मनात येत नाहीत आणि अशा आत्मक्लेशाला महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही असे शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणालेत.