बंगळुरू : ‘गूगल’ला गूगल ग्लास बनवण्यासाठी जवळपास एका वर्षाचा वेळ लागला... हेच गूगल ग्लास जवळपास एक लाखाच्या घरात उपलब्ध आहे. परंतु, एका भारतीय तरुणानं केवळ एका महिन्यातच ‘गूगल ग्लास’सारखंच एक डिव्हाईस बनवलंय... महत्त्वाचं म्हणजे, त्यानं केवळ 4500 रुपयांत हे डिव्हाईस तयार केलंय.
कोच्चीला राहणाऱ्या अरविंद संजीव या तरुणानं ही किमया घडवून आणलीय. संजीवनं बनवलेलं हे डिव्हाईस एका चश्म्याच्या रुपात नाही तर एका टोपीच्या आकाराचं आहे. यासाठी त्यानं आपल्या ओपन सोर्स हार्डवेअरची मदत घेतलीय.
अशाच पद्धतीचं डिव्हाईस बनवणं इतरांनाही शक्य व्हावं, यासाठी संजीवनं एक ब्लॉगही लिहिलाय. या ब्लॉगमध्ये त्यानं हा ‘स्मार्टकॅप’ कसा बनविता येऊ शकतो आणि यासाठी तुम्ही रासबेरी पाय कम्प्युटर, आर्डयिनो बोर्ड आणि अँन्ड्रॉईड सॉफ्टवेअरसारख्या ओपनसोर्स हार्डवेअरचा वापर कसा करू शकता, हे सांगितलंय.
अरविंदनं बनवलेल्या या स्मार्टकॅपमध्ये व्हिडिओ शेअरिंग आणि रेकॉर्डिंगसाठी एक वेबकॅम आहे. 2.5 इंचाचा डिस्प्ले आणि हॅडस फ्री काम करण्यासाठी व्हॉईस रिकग्निशन सिस्टमही उपलब्ध आहे. हार्डवेअर प्लॅटफॉर्म, रेपरॅप थ्री डी प्रिंटर्स, इलेक्ट्रॉनिक्सची माहिती असणारं कोणतेही विद्यार्थी, इंजिनिअर किंवा उद्योजक अशा प्रकारचं हार्डवेअर प्रोडक्ट बनवू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.