‘यारा... यारा... फ्रेंडशीपचा खेळ सारा...’

मैत्री... या नात्याविषयी काय बोलावं किंवा किती? हा प्रश्न भल्याभल्यांना पडतो. रक्ताचं नातं नसलेले हे संबंध... म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर सर्व काही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 13, 2013, 08:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मैत्री... या नात्याविषयी काय बोलावं किंवा किती? हा प्रश्न भल्याभल्यांना पडतो. रक्ताचं नातं नसलेले हे संबंध... म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर सर्व काही. आपल्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ काढा आणि थोडा विचार करून बघा आपण किती वेळा आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी आपल्या मित्रांवर अवलंबून राहिलेलो आहोत ते... आणि तेही एकदम बिनधास्त!
‘यारा... यारा... फ्रेंडशीपचा खेळ सारा...’ असं म्हणत आपल्या जीवनाची दुनियादारी पूर्ण करीत असताना मैत्री या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं नाही. कारण, मैत्री हे दोन शब्द उच्चारताच हृदयाच्या कोंदनामध्ये, आठवणींच्या मखमली कापड्याने गुंडाळेली एक प्रतिमा आपल्या सर्वांच्या नयनांसमोर अवतरते तर त्याच प्रतिमेच्या संदर्भातील सर्व नव्या-जुन्या आठवणी एका चित्रपटाप्रमाणे हृदयात साठल्या जातात. एवढेच नव्हे तर त्या आठवणींमध्ये गुंतून जाऊन आपल्या नयनांच्या कडा कधी ओल्या होतात, हे आपणास समजत नाही. मग ती प्रतिमा त्याची असो अथवा तिची असो. असे असतानाच नेमकी हीच प्रतिमा आपल्या नयनांमध्ये आपण का साठवून ठेवली आहे? याच प्रतिमेच्या आठवणींनी आपल्या नयनांच्या कडा अश्रूंनी का ओल्या व्हाव्यात? असा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारला तर हे आठवणींनी भारावलेलं मन सांगेल की हीच खरी मैत्री आहे. जी तुझ्या सुख, दु:खांच्या क्षणांमध्ये अगदी एकरूप होऊन तुला मदतीचा हात देत असते. वेड्या, उगाच नाही कुणाचं मन कुणासाठी विरघळत आणि कुणाचे नयन कुणासाठी अश्रू ढाळत. हीच खरी किमया असते या मैत्रीच्या नात्याची. उगाच नाहीत अशा भावना उफाळून येत मैत्रीची साक्ष देण्यासाठी.

मैत्री हे नाते रक्ताचे नसले तरीही त्या नात्याला श्वासाइतके महत्त्व आहे. कारण या नात्यामध्ये असणारा आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संकटसमयी धावून येण्याची जिद्द हेच होय. या शुध्द भावनांच्या आधारावर असणारी मैत्री ही कोणाबरोबर असावी याचा काही नियम नाही. मैत्री ही लहानांची मोठ्याशी, मुलाची मुलीशी तर संकट समयी धावून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपली मैत्री असते. या मैत्रीला कोणत्याही भेदभावाचा डाग नाही. त्यामुळेच या नात्याचे महत्त्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे. शाळेतील मैत्री खेळण्या-बागडण्याचा आनंद देते तर कॉलेजच्या मैत्रीची जिंदगी काही औरच असते. तिची मला खूप काळजी वाटतेय, तू पोहचलास का घरी?, तू जेवलीस का?, ती आज कॉलेजला आलीच नाही, तू आजारी आहेस का?, काही मदत लागली तर फोन कर, अरे.. यार मैत्रीसाठी काय पण... अशा एक ना अनेक वाक्यांनी कॉलेज जीवनातील मैत्रीचे स्वरूप अगदीच जिवलग झाल्याचे आपणास दिसून येते. कॉलेज कट्ट्यावरील मित्र-मैत्रिंणीची चाललेली एकमेकांबाबतची विचारपूस, मैत्रीच्या भावनांना आपलेपणाचा सुगंध कधी दरवळून टाकते, हे आपल्यालाही कळत नाही. तर जिवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांच्या मनातील हितगुज जाणून घेत असतानाही जीवनातील सुख, दु:खांचा सारीपाट आपल्याला नेहमीच ठेंगणा वाटत असतो. पण, या मैत्रीची ताकद म्हणावी तरी किती? जिवलग मित्रासाठी मित्राने आपले प्राण पणाला लावल्याची उदाहरणे आपल्याला कमी का माहीत आहेत. मैत्री ही नेमकी हात आणि डोळ्यांसारखी आहे. जर हाताला लागले तर डोळ्यांत पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसण्यासाठी हातच पुढे येतात. तसे मित्राच्या कोणत्याही दु:खात मदतीसाठी मैत्रीचेच हात पुढे येतात. या सर्वांमध्ये मित्र किंवा मैत्रिणीविषयी असणारी निढळ, स्वच्छ, निःस्वार्थी भावना आपल्या हृदयामध्ये आपसूकच गोडवा निर्माण करून जाते. मैत्रीतील ते रुसणं, हसणं आणि उगाचंच कशावरून तरी भांडणं हे या मैत्रीमध्ये अधिकच रंग निर्माण करून जातं. पुन्हा त्या मित्राच्या अथवा मैत्रिणीच्या आठवणीमध्ये स्वप्नांची दुनिया रंगविताना आपणच आपल्या मनाला दोष दिल्याशिवाय राहात नाही. त्याचे कारण म्हणजे स्वतःपेक्षा आपलीच जास्त काळजी घेणा-या मित्राचं मन आपण दुखावलेलं असतं. आयुष्यामध्ये कोणतीही संकटं ठेचकाळली तरी आपण ती मैत्रीच्या आधाराने सर करून त्या संकटावर मात करीत असतो. यामागे मैत्रीतून मिळालेला आधार आणि तितक्याच उन्मेषाचा असलेला विश्वास हा महत्त्वाचा ठरतो. तिचा चुकलेला मार्ग तो सावरतो तर त्याच्या चुकांवरती चार शब्द सुनावण्यासाठी तीही मागेपुढे पाहात नाही...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.