www.24taas.com, झी मीडिया, ब्युरो
काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्य़ा राजकारणात वादळ निर्माण झालंय. नव्वदच्या दशकात राजकीय कारकिर्द सुरु करणा-या राणेंनी कायम आक्रमक राजकारण केलं. पण राजकारणातील त्यांची आक्रमक स्टाइलच दरवेळी त्यांना नव्या वळणावर घेऊन गेली.
नारायण तातू राणे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या खेळीनं विरोधकांनाच नव्हे, तर स्वपक्षीयांनाही जेरीस आणणारं मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे नारायण राणे. कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात लाडका असा हा कडवा शिवसैनिक. आयकर खात्यात नोकरीला असलेला, चेंबूरला राहणारा कोकणी माणूस. बाळासाहेबांच्या मुशीत राणेंचं नेतृत्व बाळसं धरू लागलं आणि या आक्रमक शिवसैनिकाचा राजयोग बळकट होत गेला.
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदापासून ते बेस्टच्या चेअरमनपदापर्यंत, त्यांची झेप पाहून १९९० साली बाळासाहेबांनी त्यांच्यावर सिंधुदुर्गाची जबाबदारी सोपवली. मालवण कणकवली या समाजवाद्यांच्या गडात भगवा रोवण्याचे आदेश दिले. राणेंनी पहिल्याच दमात केवळ आमदारकीच जिंकली नाही, तर अवघ्या तळकोकणात आपल्या समर्थकांसह साम्राज्य निर्माण केलं.
1995 मध्ये राज्यात सेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर नारायण राणेंच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली. मंत्रीपदाच्या काळातील धडाडीमुळेच 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं. मुख्यमंत्रीपदाच्या काळात राणेंनी संघटनेवरील आपली पकड वाढवली. त्याच काळात उद्धव ठाकरेही शिवसेनेत जम बसवत होते. एकीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राणेंची पक्षावरील मांड पक्की होत होती. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंशी त्यांची सल वाढत गेली. त्यातूनच शह-काटशहाचं राजकारण सुरू झालं आणि नारायण राणेंनी राजकीय भूकंप घडवला.
३ जुलै २००५ रोजी त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. राणेंची शिवसेनेतून एक्झीट ही केवळ शिवसेनेसाठीच नाही, तर राणेंसाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही टर्निंग पॉईंट ठरली. सोनिया गांधीचे नेतृत्व मान्य़ करत आपल्या दहा समर्थक आमदारांसह नारायण राणे काँग्रेसवासी झाले.
नोव्हेंबर २००५ मध्ये झालेल्या मालवणच्या गाजलेल्या पोटनिवडणूकीत राणेंनी शिवसेना उमेदवाराचं डिपॉझीट जप्त केलं आणि कोकण काँग्रेसमय करण्याचा विडा उचलला. राणे समर्थक आमदार श्याम सावंत मात्र पोटनिवडणुकीत पराभूत झाले. त्यावेळी काँग्रेसनं राणेंना शांत बसण्याचा आदेश दिला.
आक्रमक राणेंना काँग्रेस संस्कृतीची पहिली झलक इथं पाहायला मिळाली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारभारावर कोरडे ओढत राणेंनी बंडाचं निशाण उभारलं खरं, पण त्यांना तिथंही माघार पत्करावी लागली. विलासराव पायउतार झाल्यानंतर तरी हायकमांड आपणाला मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन पाळेल, असं राणेंना वाटलं होतं. पण काँग्रेसनं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी राणेंचा असा काही भडका उडाला की, त्यात हायकमांडच टार्गेट ठरलं. राणेंना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. काही काळानं ते पुन्हा मंत्री झाले, पण महसूलमंत्रीपदाऐवजी कमी महत्त्वाच्या उद्योग खात्यावर त्यांची बोळवण करण्यात आली.
आधी विलासराव, मग अशोक चव्हाण आणि सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वावर राणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिले, आणि प्रत्येकवेळी काँग्रेस हायकमांडची नाराजी ओढवून घेत राहिले. लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेची तमा न बाळगता विरोधकांसह मित्रपक्षालाही एकट्यानं शिंगावर घेण्याचा राणेंचा निर्णय आत्मघातकी ठरला.
राष्ट्रवादीशी पंगा झाल्यानं राणे मुलाची खासदारकीही वाचवू शकले नाहीत. पण या पराभवानंतर थंड बसतील ते राणे कसले..? निकालाच्याच दिवशी मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं पाठवून दिला. यापुढं कोकण विकासासाठी काहीही करणार नाही, हा राणेंचा इशारा परिस्थिती आणखी चिघळवणारा ठरला.लोकसभेच्या पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं नेतृत्व बदलावं यासाठी राणेंनी पुन्हा नाराजीनाट्याचा खेळ रंगवला. पण महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचे संवाद अगोदरच पाठ असलेल्या हायकमांडने या राजीनाम्याला कच-याची टोपली दाखवली.
२००५ मध्ये स्वाभिमानावरुन राणेंनी अवघ्या तळकोकणासह महाराष्ट्रात अंगार पेटवला. पण बदललेल्या राजकीय परिस्थितीत हा अंगार बेदखल झालाय.. त्यामुळं राणे आता काय नवीन पाऊल उचलणार, कोणता नवा भूकंप घडवणार, याकडे राणे समर्थकांसह विरोधकांचंही लक्ष लागलंय.