पाकिस्तानचा ‘तारण’हार?

सध्याचे लष्करप्रमुख कयानी आणि पाकिस्तान सरकार यांच्याविरोधात आणखी एक बंड घडवून आणण्याची ताकदही मुशर्रफ बाळगून असतील. त्यामुळे पाकिस्तानचा तारणहार होता-होता मुशर्रफ सगळा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘तारण’ ठेवून घेऊ शकतात. पाकिस्तानला ‘जहन्नम’मधून बाहेर काढण्यासाठी ते जीवाचा धोका पत्करून आले आहेत, असंही असू शकतं. खरं काय ते एक मुशर्रफ जाणो नाहीतर अल्ला!

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 27, 2013, 11:46 AM IST

अमोल परांजपे
असोसिएट प्रोड्युसर, झी २४ तास
स्वतःवर लादलेल्या विजनवासातून तब्बल चार वर्षांनंतर पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख, माजी हुकूमशहा, माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ मायदेशी परतले, ते ‘पाकिस्तान बचाओ’चा नारा देतच. या घटनेमुळे बेनझीर भुत्तो यांची आठवण होणं स्वाभाविक आहे. कारण या दोन्ही घटनांमध्ये बरंचसं साम्य आहे.
८ वर्षांचा दुबईतला विजनवास संपवून बेनझीर पाकिस्तानात परतल्या, त्यादेखील अशाच नॅशनल असेंब्ली निवडणुकीआधी. त्यांच्या जीवालाही मुशर्रफ यांच्याप्रमाणेच धोका होता. २७ डिसेंबर २००७ रोजी रावळपिंडीतली सभा संपल्यानंतर बॉम्बस्फोटात बेनझीर यांची हत्या झाली. या हत्येमुळे पाकिस्तानचं अराजक जगासमोर मांडलं. बेनझीर यांच्या जीवाला धोका आहे, हे माहिती असतानाही सरकारनं त्यांना पुरेशी सुरक्षा पुरवली नाही. त्यामुळे एका अर्थी हे ‘सरकार पुरस्कृत हाय प्रोफाईल असॅसिनेशन’ आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हेदेखील या हत्येच्या कटातले एक आरोपी आहेत, यावरून पाकिस्तानी नेत्यांशी अतिरेक्यांचे कसे लागेबांधे आहेत, हे स्पष्ट होतं.
आता पाकिस्तानचं ‘घर’ फिरलंय, त्यामुळे ‘वासा’देखील... पाकिस्तानचा हुकुमशहा असलेले मुशर्रफ निवडणुकीच्या तोंडावर जीवाचा धोका पत्करून पाकिस्तानात आलेत. त्यांनी जरी ‘पाकिस्तान बचाओ’ची हाळी दिली असली, तरी यामागे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षाच कारणीभूत आहे. कारण पाकिस्तानातल्या नेत्यांना आजवर आपल्या देशाची चिंता कमी आणि भारताची खोडी कशी काढता येईल, याची विवंचना जास्त असल्याचं आजवर दिसलंय. ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून’ हीच नीती तिथल्या तमाम नेत्यांनी आजवर अवलंबली. भारतद्वेष पसरवायचा आणि त्या ओझ्याखाली आपल्या देशात असलेल्या समस्या दाबून टाकायच्या, हेच राजकीय धोरण पाकिस्तानात राहिलंय. आणि याला पक्षाचं बंधन नाही... पीपीपी, पाकिस्तान मुस्लिम लीग, पीएमएल-नवाझ, मुशर्रफ यांचा ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग हे सर्व पक्ष संधी मिळेल तेव्हा हेच करत आलेत... मुशर्रफ यांची पाकिस्तानात परतल्यावर झालेली पहिली पत्रकार परिषद याला अपवाद ठरली...

देशांतर्गत शत्रूंपासून पाकिस्तानला वाचवण्यासाठी आपण परत आलो आहोत, असं मुशर्रफ यांनी सांगितलं. त्यांच्या अजेंड्यावर भारतविरोध नाही, तर पाकिस्तानला आतून कुरतडणारा दहशतवाद आहे. पाकिस्तानातही ‘विकास’ या मुद्द्यावर निवडणूक लढली जाऊ शकते, अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. ही एका अर्थी समाधानाची बाब असली, तरी ही स्थिती किती काळ टीकेल हे सांगणं कठीण आहे. मुशर्रफ पुन्हा सत्तेत आलेच, तर त्यांचा भारतद्वेष उफाळून येणारच नाही, असं छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नाही. कारण ती पाकिस्तानातली भावना नव्हे, तर राजकारणाचं एक हत्यार आहे. पण सध्यातरी मुशर्रफ हे पाकिस्तानचे तारणहार म्हणून इस्लामाबादेत परतलेत. म्हणजे असा त्यांचा दावा आहे.
अतिरेक्यांनी त्यांची सुपारी घेतलीये. एकेकाळी हेच मुशर्रफ याच अतिरेक्यांच्या गळ्यातला ताईत होते. त्यांनी अफगाणिस्तानातल्या तालिबानविरुद्ध आपली भूमी अमेरिकेला वापरू दिली आणि एकेकाळचे हे आका-चेला नातं बिघडलं. त्यामुळेच मुशर्रफ यांच्या जीवाला धोका आहे, अगदी बेनझीर यांच्याप्रमाणेच... पण एक महत्त्वाचा फरक हा आहे, की मुशर्रफ हे माजी लष्करशहा आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्करात त्यांचे अनेक हितचिंतक आजही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे हितचिंतक सैनिक त्यांना छुपं संरक्षण देऊ शकतात. कदाचित सध्याचे लष्करप्रमुख कयानी आणि पाकिस्तान सरकार यांच्याविरोधात आणखी एक बंड घडवून आणण्याची ताकदही मुशर्रफ बाळगून असतील. त्यामुळे पाकिस्तानचा तारणहार होता-होता मुशर्रफ सगळा पाकिस्तान पुन्हा एकदा ‘तारण’ ठेवून घेऊ शकतात. किंवा त्यांना आपल्या पूर्वकृत्यांचा पश्चात्ताप होऊन ते खरोखर पाकिस्तानला ‘जहन्नम’मधून बाहेर काढण्यासाठी ते जीवाचा धोका पत्करून आले आहेत, असंही असू शकतं. खरं काय ते एक मुशर्रफ जाणो नाहीतर अल्ला!
एका अर्थी ही पाकिस्तानची अंतर्गत बाब असली, तरी या उचापती शेजाऱ्याकडे आपल्यालाही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. आता तिथं निवडणूका होणार आहेत (म्हणे)! या निवडणुका नीट झाल्याच, तर नव्यानं येणाऱ्या सरकारला भारतविरोधी कारवाया न करता स्वतःच्या देशाचा विकास करण्याची सुबुद्धी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!