Asia Cup 2023 : कधी, कुठे आणि किती वाजता पाहाता येणार एशिया कपचे सामने, जाणून घ्या सर्व काही
Asia Cup 2023 Schedule Live Streaming: एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये स्पर्धेची उत्सुकता असून सर्वांचं लक्ष लागलं आहे ते भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) होणाऱ्या सामन्यावर. पाकिस्तान आणि नेपाळदरम्यानच्या (Pakistan vs Nepal) सामन्याने एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. याशिवाय भारतीय संघ नेपाळ संघाविरुद्ध खेळणार आहे. जाणून घेऊया एशिया कप स्पर्धेचे सर्व सामने कुठे, कधी आणि किती वाजता होणार आहेत.


एशिया कप स्पर्धेतील सर्वात चुरशीचा समजला जाणारा भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना 2 सप्टेंबरला रंगणार आहे. श्रीलंकेतल्या कँडी इथं हा सामना खेळवला जाणार आहे. तर भारताचा लीगमधला दुसरा सामना 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध होणार आहे. सहा संघांमध्ये दोन ग्रुप करण्यात आले असून ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ आहेत.

एशिया कप स्पर्धेची फायनल 17 सप्टेंबरला श्रीलंकेतल्या कँडी इथं होणार आहे. गेल्या वेळी एशिया कप स्पर्धेचं आयोजन टी20 फॉर्मेटमध्ये करण्यात आलं होतं. पण यावेळी 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ग्रुप स्टेनंतर सुपर -4 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर-4चे सामने 6, 9, 10, 12, 14 आणि 15 सप्टेंबरला खेळवले जाणार आहेत.


