महिलांनो, चाळीशीनंतर राहायचंय फिट? डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' टेस्ट जरुर करा
Women Test After 40 Age : चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होत असतात. अशावेळी निरोगी राहण्यासाठी कोण्त्या चाचण्या करणे आवश्यक असतात, हे डॉक्टर अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, निबर्ग अजय शहा प्रयोगशाळा यांच्याकडून समजून घेऊया.
Women Health: महिलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. रोजच्या दैनंदिन रहाटगाडीतून दिवस ढकलताना वयोमानानुसार हळूहळू आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात. चाळीशी पार झालेल्या महिलांनी आरोग्याच्या लहानसहान तक्रारींकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात जीवघेणा आजार बळावण्याची भीती असते. वयाचा ४० चा आकडा ओलांडताच महिलांनी आरोग्याबाबतीत जागरूक असणे महत्त्वाचे आहे. वयाच्या या टप्प्यात महिलांनी शारीरिक तपासणीकडे कानाडोळा करता कामा नये. आजारातून बरे होण्यासाठी योग्य वेळीच निदान होणे गरजेचे असते. तरच आजारावर मात करता येतो, असा मौलिक सल्ला डॉक्टर अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, निबर्ग अजय शहा प्रयोगशाळा देतात.
मॅमोग्राफी
![मॅमोग्राफी Women Health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/22/720409-mammography.png)
महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता स्तन कर्करोगाचे वेळीच निदान होण्याच्या हेतूखातर मॅमोग्राफी चाचणी फार महत्त्वाची ठरते. महिलांच्या स्तनांमधील पेशींमध्ये ट्यूमर ओळखण्यासाठी मॅमोग्राफी चाचणी म्हणजेच स्तनांचे स्क्रीनिंग केले जाते. महिलांना स्तन कर्करोगावर तातडीने औषधोपचार सुरू करणे आवश्यक असते. त्याकरिता स्तन कर्करोगाचे वेळीच निदान व्हायला हवे. कर्करोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार, महिलांनी दोन किंवा वर्षातून एकदा मॅमोग्राफी तपासणी जरूर करावी.
हाडांची कार्यक्षमता जाणून घेणे
![हाडांची कार्यक्षमता जाणून घेणे Women Health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/22/720408-bonesmain.png)
वाढत्या वयासह माणसाच्या शरीरातील हाडे ठिसूळ होत जातात. हाडे ठिसूळ होत राहिली की कालांतराने रुग्णाला 'ओस्टेओस्पॉरॉयसिस' (हाडांचा ठिसूळपणा) हा आजार होतो. महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात 'ओस्टेओस्पॉरॉयसिस' आजार हमखास पाहायला मिळतो. या आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी महिलांनी हाडांची कार्यक्षमता जाणून घेणारी चाचणी जरुर करावी. डेक्सा स्कॅन तपासणीकरून शरीरातील हाडांची कार्यक्षमता जाणून घेता येते. ठिसूळ हाडांमध्ये अपघातात फ्रॅक्चर होण्याची क्षमता असेल तर या चाचणीतून अगोदरच संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना येते. 'ओस्टेओस्पॉरॉयसिस' आजार समजल्यावर डॉक्टर्स बरेचदा रुग्णांना जीवनशैलीत बदल करण्याचे सूचवतात. औषधोपचारानंतर रुग्ण अपघाती फ्रॅक्चरपासून वाचू शकतो. हाडांचे आरोग्य सुधारायचे असेल तर ठराविक अंतराने हाडांची कार्यक्षमता जाणून घेणारी डेक्सा स्कॅन तपासणी जरूर करावी.
रक्तदाब
![रक्तदाब Women Health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/22/720405-bloodpressure.png)
रजोनिवृत्तीच्या काळानंतर महिलांमध्ये हृदयरोगाचाही धोका संभवतो. रक्तातील कॉलेस्ट्रॉल सारख्या चरबीला किंवा फॅटला इंग्रजीत लिपिड असे संबोधले जाते. हृदयरोगासारख्या घातक आजारापासून बचाव करण्यासाठी महिलांनी ठराविक अंतराने रक्तदाब तपासणी, शरीरातील वाढत्या चरबीवर नियंत्रण राहण्यासाठी लिपिड प्रोफाईल चाचणीही करावी. या चाचणीत कॉलेस्ट्रॉल चाचणीचा प्रामुख्याने समावेश करावा. या चाचण्यांमधून हृदयविकार, पक्षघात यांसारख्या घातक आजाराची संभाव्यताही लक्षात येते.
थायरॉईड
![थायरॉईड Women Health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/22/720404-thyroid-1.png)
वाढत्या वयानुसार महिलांना थायरॉईडशी संबंधित 'हायपरथायरॉईडीजम' आजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गळ्यातील थायरॉईड ग्रंथीत काही स्त्रावांचे प्रमाण वाढले की 'हायपरथायरॉईडीजम' आजार होतो. या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपात असली तरीही इतर आजारांना किंवा त्रासदायी घटकांना पोषक ठरण्याची भीती असते. महिलांनी न चुकता थायरॉईड कार्यक्षमता चाचणी करावी. चाचणी अहवालाच्याआधारे थायरॉईडच्या बिघडत्या कार्यक्षमतेवर नियंत्रण ठेवता येते शिवाय थायरॉईडचे दैनंदिन कार्य सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते. डॉक्टरही थायरॉईड कार्यक्षमता चाचणी न चुकता करण्याचा सल्ला देतात.
कॉलनोस्कॉपी
![कॉलनोस्कॉपी Women Health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/22/720403-colonoscopy.png)
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढत असताना आता गुदद्वाराच्या कर्करोगाचेही वाढते प्रमाण चिंताजनक आहे. महिलांनी वयाच्या चाळीशीचा टप्पा पार केला असेल तर गुदद्वाराच्या कर्करोगासारखा भयावह आजार जडण्याची भीती नाकारता येत नाही. कॉलनोस्कॉपी ही निदान पद्धती खासकरून गुदद्वाराच्या कर्करोगासाठी वापरली जाते. गुरुद्वाराच्या कर्करोगावर यशस्वीरित्या मात करायची असेल कॉलनोस्कॉपी तपासणीतून योग्य निदान आणि उपचारपद्धती हा एकमेव रामबाण उपाय ठरतो.
चाळीशीनंतर
![चाळीशीनंतर Women Health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/22/720402-expert.png)
महिलांनी एकदा वयाची चाळीस वर्षे पूर्ण केली की त्यांना वेगवेगळ्या शारीरिक आव्हानांना, वेदनादायी आजारांना सामोरे जावे लागते. महिलांच्या शरीरात आजारांची लक्षणे दिसून येतात त्यावर प्रतिबंधात्मक उपायोजना परिणामकारक ठरते. शरीरातील साध्यासुध्या तक्रारींवर डॉक्टरांकडून वेळीच मार्गदर्शन घ्यावे. रुग्णांच्या शारीरिक तक्रारी, आजारांबाबतची माहिती डॉक्टर्स काळजीपूर्वक ऐकतात. डॉक्टरांनी सूचवलेल्या वैद्यकीय तपासण्या महिलांनी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता बाळगावी. जितक्या लवकर आजाराचे निदान होते तितक्या लवकर मुक्तताही मिळते. महिलांना आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगता येते.
मधुमेह
![मधुमेह Women Health](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/22/720401-diabetes-1.png)