पाकिस्तान सोडा, टीम इंडियासाठी पुढचा पेपर अधिक अवघड! आजच्या सामन्यानंतर भारत सेमी-फायनलमध्ये कसा पोहोचणार?

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत स्पर्धेतील चार सामने झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक विरोधी संघांमध्ये खेळवला जाणार असून या हायव्होल्टेज   सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Pooja Pawar | Feb 23, 2025, 14:30 PM IST

 

 

1/7

रविवार 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील त्यांचा दुसरा ग्रुप स्टेज सामना खेळतील. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 8 संघांनी क्वालिफाय केलं असून यात 4-4 संघांचे दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत. यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड हे संघ ग्रुप ए चा भाग आहेत. तर उर्वरित ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे 4 संघ ग्रुप बी चा भाग आहेत. 

2/7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रीड पद्धतीने खेळवली जात असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवले जातील. 19 फेब्रुवारी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध 60 धावांनी पराभव झाला. तर भारताने 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. 

3/7

कसं आहे सेमी फायनलचं समीकरण?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यात प्रत्येक संघाला एकूण तीन सामने खेळायचे आहेत. ग्रुपमध्ये टॉपवर असणारे दोन संघ थेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायलनसाठी क्वालिफाय होतील. तर एक संघ स्पर्धेतून बाहेर होईल. त्यामुळे सेमी फायनलमध्ये एंट्री मिळवण्यासाठी संघाला दोन सामने जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. 

4/7

टीम इंडियाचं टेन्शन वाढणार?

भारताने यापूर्वीच बांगलादेशला हरवल्यामुळे त्यांनी जर पाकिस्तान विरुद्ध सुद्धा विजय मिळवला तर ते थेट सेमी फायनल गाठतील. तर पाकिस्तान जर या सामन्यात पराभूत झाला तर मात्र यजमान पाकिस्तान थेट चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडेल. परंतु जर पाकिस्तानने भारताला या सामन्यात पराभूत केलं तर मात्र टीम इंडियाचं टेन्शन वाढणार आहे. 

5/7

टीम इंडिया हरली तर काय?

सध्या टीम इंडिया पहिला सामना जिंकून 2 पॉईंट्स मिळवत ग्रुप ए मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड सुद्धा पाकिस्तानला हरवल्यावर ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभूत झाली तर त्यांना न्यूझीलंड विरुद्धचा सामना चांगल्या रन रेटने जिंकावा लागेल. परंतु ते भारतासाठी फार सोपं असणार नाही. 

6/7

कसा आहे भारत - न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड?

टीम इंडियाचा पुढील सामना हा न्यूझीलंड विरुद्ध असणार आहे. न्यूझीलंड ही ग्रुप ए मधील मजबूत टीम असून त्यांचं विरुद्ध विजय मिळवणं हे भारतासाठी फार सोपं नसेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाने न्यूझीलंडचा एकदाच सामना केला आणि त्यात त्यांना पराभूत व्हावे लागले होते. जर न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया पराभूत झाली तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. 

7/7

पराभव झाल्यास भारत सेमी फायनलमध्ये कसा पोहोचणार?

टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला तर त्यांना न्यूझीलंड विरुद्धचा सामना चांगल्या रनरेटने जिंकावा लागेल. कारण अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान 2-2 पॉईंट्स सह एकाच पायरीवर असतील. त्यामुळे दोघांपैकी कोणत्या संघाचा रन रेट जास्त असेल तो संघ ग्रुप ए मधून सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करू शकेल.